मानेसर येथील मारुती सुझूकी प्रकल्पामध्ये २०१२ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने १३ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. २०१२ मध्ये एका वादातून कामगार आणि व्यवस्थापनामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. त्यामध्ये एका व्यवस्थापकाचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे उद्योग विश्वात खळबळ उडाली होती.  अतिरिक्त न्यायाधीश आर. पी. गोयल यांनी आज निकाल वाचून दाखवला. बाकी चार दोषींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनी चार वर्षांची शिक्षा भोगली आहे. या प्रकरणातील १४ आरोपींना दंड भरण्यास सांगून त्यांची सुटका करण्यात आली आहे.

राम मेहर, संदीप धिल्लोन, रामविला, सरबजीत सिंग, पवन कुमार, सोहन कुमार, प्रदीप कुमार, अजमेर सिंह, जिया लाल, अमरजीत कपूर, धनराज भांबी, योगेश कुमार आणि प्रदीप गुज्जर यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  पाच वर्षांपूर्वी मानेसर येथील मारुती प्रकल्पामध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात हत्या झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गुरुग्रामपासून जवळ असलेला मानेसर मारुती प्रकल्प या हिंसाचारामुळे काही काळासाठी बंद देखील पडला होता. १२ जुलै २०१२ रोजी कामगार आणि व्यवस्थापकांमध्ये वाद झाला. याचे रुपांतर भांडणात झाले आणि काही कामगारांनी चिडून फॅक्टरीच्या एका मजल्याला आग लावली. एच. आर. मॅनेजर अवनीश कुमार देव यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त अनेक जण जखमी झाले होते.

या हिंसाचारामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांनी १४७ कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा, दंगल करणे आणि हिंसाचार करणे असे आरोप लावण्यात आले होते. या घटनेनंतर ५५० कायमस्वरुपी कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते तर १,८०० कंत्राटी कामगार काढण्यात आले होते. १८ जुलै रोजी किरकोळ कारणावरुन तेथील कामगार आणि व्यवस्थापकांमध्ये वाद झाला होता. तेथील व्यवस्थापकाने एका कामगाराच्या थोबाडीत मारली म्हणून हा वाद सुरू झाला होता असे काही जणांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांतील उद्योग क्षेत्रामध्ये घडलेली एक मोठी हिंसाचाराची घटना म्हणून या प्रकरणाकडे पाहले जात होते. आता सध्या नव्या कामगारांसह प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे.