सोमवारी मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयिताने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. 36 वर्षे वयाचा हा संशयित पोलिस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक कार्यालयात काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास हजर झाला. तेथे त्याला चौकशी व वैद्यकीय चाचण्यांसाठी ताब्यात घेण्यात आले. आदित्य राव असे या संशयिताचे नाव असून तो मणिपालचा आहे. विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे. विशेष म्हणजे तो उच्चशिक्षीत असून त्याने अभियांत्रिकी व एमबीएची पदवी घेतल्याची माहिती आहे. त्याने नोकरी नाकारल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राव याला जाबजबाबासाठी बेंगळूरुतील हासूर गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तो अभियांत्रिकी व एमबीए पदवीधारक आहे. त्याला यापूर्वी 2018 मध्ये बेंगळूरु विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती, त्या वेळी तो सहा महिने तुरुंगात होता. बेंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी नाकारल्याने त्याने सूडापोटी त्या वेळी खोटा धमकीचा फोन केला होता. राव हा 2012 मध्ये बेंगळूरुत आला व त्याला नंतर खासगी बँकेत नोकरी मिळाली, पण तेथे त्याने राजीनामा दिला. नंतर तो परत मंगळूरुला गेला व तेथे सहा महिने सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. नंतर उडुपीत पुथीगे मठ येथे तो स्वयंपाकी होता. नंतर तो पुन्हा बेंगळूरुत आला. तेथे एका विमान कंपनीत काम केले, पण ते काम सोडून पुन्हा त्याने पुन्हा विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा त्याला नोकरी नाकारण्यात आली. त्याच रागातून त्याने यावेळी खोटा फोन न करता चक्क जीवंत बॉम्ब विमानतळ परिसरात ठेवला. पण, त्याने तो बॉम्ब आणला कुठून, त्यासाठी त्याला स्फोटकं किंवा IED कुणी पुरवली या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान मंगळूरु पोलिसांचे एक पथक येथे आले असून ते त्याचे जाबजबाब घेत आहेत. मंगळूरुचे पोलीस आयुक्त पी.एस. हर्ष यांनी सांगितले की, तपास पथक या संशयिताचे जाबजबाब घेणार असून नंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आदित्यच्या आईचा मृत्यू झाला असून त्याचे वडील मंगळुरूमध्येच राहतात अशी माहिती पोलिसांनी दिली.