ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी सोमवारी केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील एका सभेत जंगी टोलेबाजी केली. अय्यर यांच्या या विधानातून उडालेल्या गदारोळामुळे अखेरीस त्यांना सारवासारव करावी लागली खरी, पण त्यांच्या विधानातील सोईस्कर भाग तेवढा वापरून मोदी आणि त्यांच्या ट्विटरसेनेने फेक न्यूजचे हत्यार वापरून राहुल गांधींच्या बिनविरोध निवडणुकीत खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात बोलताना अय्यर यांनी काही विधाने केली. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव शेहजाद पुनावाला यांनी राहुल यांच्या निवडीतील कथित गैरप्रकारांवर घेतलेल्या आक्षेपांच्या पाश्र्वभूमीवर अय्यर म्हणाले, ‘जेव्हा जहाँगीरच्या जागेवर शाहजहाँ आला, तेव्हा काय निवडणूक झाली होती? जेव्हा शाहजहाँची जागा औरंगजेबने घेतली, तेव्हा तरी निवडणूक कुठे झाली होती? कारण त्यावेळी राजकुमारालाच आपोआप सिंहासन मिळणार, हे उघडच होते. मात्र आता काळ बदलला आहे. काँग्रेस पक्षातही अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाते. पूनावाला यांना अर्ज भरून निवडणूक लढवण्याची मुभा कोणी नाकारलेली नाही.’

अय्यर यांच्या या विधानाचे लगेचच पडसाद उमटले. रविवारच्याच सभेत मोदींनी शेहजाद पुनावालांच्या हवाल्याने राहुल यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वाभाडे काढले होते. धरमपूर येथील सभेत ते म्हणाले, ‘एका कुटुंबाच्या चरणी निष्ठा वाहणारे मणिशंकर अय्यर अभिमानाने मुघलांशी तुलना करतात. या औरंगजेब राजबद्दल मी काँग्रेसचे अभिनंदन करतो. आमच्यासाठी जनता सर्वस्व आहे आणि १२५ कोटी आमचे पक्षश्रेष्ठी आहेत.’

नंतर स्वत: अय्यर यांनीही सारवासारव केली. आपण केवळ दोन काळांची तुलना केली, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांनीही भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पण अय्यर यांच्या विधानामुळे भाजपला पुन्हा एकदा कोलित मिळाले हे नाकारता येत नाही.