‘गांधी कुटुंबाने संघटनेत सक्रिय रहावे’

राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याबाबत अनिश्चितता असतानाच, एखादा ‘गैर-गांधी’ पक्षाचा प्रमुख होऊ शकतो; मात्र गांधी कुटुंबाने संघटनेत सक्रिय राहायला हवे, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे उद्दिष्ट ‘काँग्रेस-मुक्त भारत’ करण्यासाठी ‘गांधी-मुक्त काँग्रेस’ करणे हा असल्याचा दावा अय्यर यांनी केला. राहुल हेच पक्षाचे अध्यक्ष राहिले, तर ते सर्वोत्तम असेल; मात्र याच वेळी त्यांच्या स्वत:च्या इच्छेचाही आदर ठेवला पाहिजे, असे अय्यर म्हणाले.

नेहरू-गांधी कुटुंबातील कुणी पक्षाचा शीर्षस्थ नेता नसला, तरीही आम्ही टिकू शकतो याची मला खात्री आहे; मात्र अट अशी, की नेहरू-गांधी परिवाराने पक्षात सक्रिय राहावे आणि कधी गंभीर मतभेद उद्भवले तर पेचप्रसंग सोडवण्यात ते मदत करू शकतील, असे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अय्यर यांनी सांगितले.

आपला पर्याय शोधण्यासाठी राहुल यांनी पक्षाला सुमारे एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुद्दय़ावर पक्षात बरेच चर्वितचर्वण सुरू असून, राहुल यांनीच पदावर कायम राहावे याबाबत बहुतांश लोक अनुकूल आहेत, असे अय्यर म्हणाले. या मुद्दय़ावर अटकळबाजी करण्याऐवजी, पर्याय सापडला आहे, की राहुल यांनीच काँग्रेसचे प्रमुख राहावे यासाठी त्यांचे मन वळवण्यात यश येते हे कळण्यासाठी माध्यमांनी मुदत (डेडलाइन) पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, असे मत माजी केंद्रीय मंत्री असलेले अय्यर यांनी व्यक्त केले.

हा व्यक्तिमत्त्वांचा मुद्दा आहे असे मला वाटत नाही. काँग्रेस-मुक्त भारत होण्यासाठी गांधी-मुक्त काँग्रेस करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे, हे मला माहीत आहे. त्यांच्या या जाळ्यात आम्ही अडकू नये असे मला वाटते, असेही अय्यर म्हणाले.

नेहरू-गांधी घराण्याबाहेरील लोकही पक्षाचे अध्यक्ष होते, हे सांगण्यासाठी अय्यर यांनी यू.एन. ढेबर यांच्यापासून ब्रह्मानंद रेड्डी यांच्यापर्यंत पक्षाच्या इतिहासातील अनेक उदाहरणे दिली. हाच कित्ता आताही गिरवला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.