काँग्रेसचे निलंबित नेते यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे कायदे आझम होते त्यांच्यावरून भाजपा अकारण वादंग निर्माण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. गुजरात निवडणुकांच्या काही दिवस आधी मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली होती. ज्याचा फटका काँग्रेसला बसला होता. तसेच पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. आता पुन्हा एकदा मणिशंकर अय्यर यांनी लाहोर या ठिकाणी जाऊन जिना यांचे समर्थन केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

भारताची फाळणी झाली त्यासाठी त्यासाठी मोहम्मद अली जिना यांना जबाबदार धरले जाते. मात्र जिना फाळणीसाठी जबाबदार नाही. जिना यांच्यावरून उगाचच वाद सुरु आहे. मला पाकिस्तानात असे काही लोक माहित आहेत जे मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी असे संबोधतात. मग ते सगळे लोक पाकिस्तानसाठी देशद्रोही ठरले का? असाही प्रस्न अय्यर यांनी विचारला आहे.

वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मणिशंकर अय्यर यांचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य या निमित्ताने समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एका इंटरनॅशनल प्रेस कॉन्फरन्ससाठी पाकिस्तानात गेले आहेत. २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी ७० टक्के लोकांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही कारण त्यांच्या मतांमध्ये फूट पडली होती. या लोकसभा निवडणुकांच्या वेळी हे विखुरलेले ७० टक्के एकत्र येतील आणि भाजपाच्या अराजकतेच्या वातावरणातून देशाची सुटका करतील असेही त्यांनी म्हटले आहे.

कायम वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याने काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांना निलंबित केले आहे. निलंबनानंतर अय्यर ज्यावेळी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात गेले त्यावेळी त्यांना तिथे पाहून अनेक दिग्गज नेत्यांनी आक्षेपही नोंदवला होता. आता पुन्हा एकदा देशात अराजकतेचे वातावरण असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.