पोटच्या मुलीवर ६०० हून अधिकवेळा बलात्कार करणाऱ्या मलेशियातील एका नराधम बापावर सध्या खटला सुरु आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा सुनावली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही शिक्षा तब्बल १२ हजार वर्षांपर्यंत असू शकते. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असून ती आपल्या घटस्फोटित पित्यासोबत राहत होती.

पोटच्या मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाप ३६ वर्षांचा असून त्याच्याविरोधात एकूण ६२६ आरोपांवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीविरोधात नोंदवण्यात आलेल्या कलमांच्या वाचनासाठीच न्यायालयातील अधिकाऱ्यांना दोन दिवसांचा कालावधी लागला. घटस्फोटित आरोपीने त्याच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ६०० वेळा बलात्कार केला आहे. आरोपीविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपांपैकी ५९९ आरोप अनैसर्गिक बलात्कारासंबंधित आहेत. याशिवाय बलात्कार आणि लैंगिक छळाचे आरोपदेखील नराधम बापावर आहेत.

गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु होती. यावेळी आरोपी शांतपणे त्याच्यावरील आरोप ऐकत होता. आपण निरपराध असल्याचे त्याने यावेळी म्हटले. आता या आरोपांवरुन नराधम बापाला शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीची जामीन याचिका फेटाळली आहे. या प्रकरणातील आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याने जामीन नाकारण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अनैसर्गिक शरीरसंबंधांच्या प्रत्येकी आरोपासाठी मलेशियात दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच दोषी व्यक्तीला चाबकाने फटकदेखील दिले जातात. या प्रकरणात आरोपीवर बलात्काराचादेखील आरोप असून त्यासाठी त्याला जास्तीत जास्त २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. याशिवाय आरोपीवर ३० लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. यासाठी कमाल २०-२० वर्षांची शिक्षा होऊ शकते. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरुन आरोपीला २६ जुलैला अटक करण्यात आली. आरोपीने पीडितेवर जानेवारी महिन्यात अत्याचार केल्याची माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली. या काळात पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत राहत होती.