मणिपूरमध्ये भूमिपुत्र- उपरे वादावरून उसळलेल्या दंगलीनंतर अनिश्चित काळासाठी जारी केलेली संचारबंदी गुरुवारपासून पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
चंद्रचुडापूर जिल्ह्य़ामध्ये मागील आठवडय़ात वादग्रस्त विधेयके संमत केल्यावरून पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यामध्ये एका खासदार, मंत्र्याच्या घरासह पाच आमदारांच्या घरांना आग लावण्यात आली होती. तसेच जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले होते तर ३० जण जखमी झाले होते.
तणावाचे वातावरण निवळल्यानंतर नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आठ तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. तणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राच्या आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, मणिपूर सरकारने १९५१ पूर्वीच्या नागरिकांना विविध हक्क देण्यासाठी विधेयक संमत केले होते. या विधेयकांमुळे मणिपूरमधील डोंगरभागातील नागरिकांचा कोणताही हक्क हिरावून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.