दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची सोमवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सभा आणि प्रचारांचा एकच धुरळा दिल्लीमध्ये उडाला आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही अशी टीका एका जाहीर सभेमधून केली. मात्र या टीकेला आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी थेट अमित शाह यांच्या डोअर टू डोअर कॅम्पेनचे सीसीटीव्ही फूटेज जारी करुन उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांनी प्रचारफैरी झाडल्या. दिल्लीतील आप सरकारने गेली पाच वर्षे जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप शाह यांनी सोमवारी केला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर नवे सरकार अस्तित्वात येईल आणि दिल्लीतील विकासाला वेग येईल, असेही ते म्हणाले. तसेच या भाषणामध्ये शाह यांनी दिल्ली सरकारच्या सीसीटीव्ही लावण्याचा निर्णयावरुनही टीका केली. “दिल्लीच्या विकासासाठी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरा लावले जातील असं सांगितलं होतं. मात्र आजही दिल्लीचे लोक हे सीसीटीव्ही कॅमेरा शोधत आहेत,” असा टोला शाह यांनी लगावला होता.

तुम्हीच सापडला सीसीटीव्हीमध्ये

अमित शाह यांच्या याच टीकेवरुन आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया थेट पुराव्यासहीत शाह यांना उत्तर दिले आहे. “खोट्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. अमित शाह म्हणाले होती की केजरीवाल सरकारने कुठे कॅमेरा लावले आहेत. त्यानंतर ते स्वत:च प्रचार करताना दिल्ली सरकारने लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत,” असा टोला सिसोदिया यांनी फेसबुक पोस्टमधून लगावला आहे. या पोस्टबरोबर त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

सिसोदिया यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आधी अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ दिसतो. त्यानंतर सुधारित नागरिकत्व कायदा आणि सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी शाह यांनी सुरु केलेल्या डोअर टू डोअर मोहिमेचे सीसीटीव्ही फुटेज या व्हिडिओमध्ये दिसतात. अमित शाह यांचा हा प्रचार दौरा एकाच वेळी तीन वेगवगेळ्या सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये कैद झाला आहे. हे कॅमेरा दिल्ली सरकारनेच लावले आहेत हेच सिसोदिया यांनी यामधून सुचित करायचं आहे.

आता सिसोदिया यांच्या या पोस्टला भाजपा काय उत्तर देते हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल.