दिल्लीमध्ये लसीकरणाच्या आणि करोना प्रादुर्भावाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारं राजकारण चांगलच तापलं आहे. काल भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर करोना मृतांचे खरे आकडे लपवल्याचा आरोप केला. यावर आज उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी अगदी खोचक शब्दात केंद्र सरकारवर टीका केलीय. सिसोदीया यांनी ट्विटवरुन केंद्राला टोला लगावताना विरोधी पक्षात असणाऱ्या राज्यांविरोधात लढण्यासाठी शक्ती वापरण्याऐवजी केंद्राने तिचा वापर करोनाविरुद्धच्या लढ्यात करावा असं सिसोदीया म्हणालेत.

सिसोदीया यांनी ट्विटरवरुन केंद्र सरकारकडून सुरु असणाऱ्या राजकारणावर नाराजी व्यक्त केलीय. “केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारांशी लढण्यासाठी वापरत आहे त्याच्या एक टक्का जरी करोनाविरुद्धच्या लढाईत किंवा लसीकरणाची व्यवस्था बसवण्यासाठी वापरलं असतं तर आज देशात हाहाकार उडाला नसता. एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता. पण ते म्हणतात ना ज्याच्या मानसिकतेमध्ये जे असतं तेच तो करतो तसा प्रकार आहे,” असा टोला सिसोदीया यांनी लगावला आहे.

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सोमवारी केजरीवाल यांच्यावर मृतांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप केला. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांच्या बाता करता करता केजरीवाल सरकारने दिल्लीला प्रती १० लाख व्यक्तींमधील मृत्यूच्या यादीत आघाडीवर आणून दाखवण्याच काम केल्याची टीका गुप्ता यांनी केली. केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत असल्याचा टोला गुप्ता यांनी लगावला. मागील वर्षाप्रमाणे यंदाही केजरीवाल यांनी करोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप करताना गुप्ता यांनी दिल्लीतील आप सरकारच्या कारभारावर टीका केलेली.