काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांची मागणी

जी २० बैठकीत नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसने याच मुद्दय़ावरून भारतातील जनतेची फसवणूक करणाऱ्या मोदींनी जनतेची माफी मागावी आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करावेत अशी मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. आता ८२७वा दिवस आला तरी मोदी काळा पैसा भारतात परत आणण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आठवेळी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० बैठकीत काळ्या पैशाचे व्यवहार होऊ नयेत यासाठी बँकिंग क्षेत्रातील गुप्तता कमी करण्याची गरज असल्याचे मत मांडले.

तसेच या बाबत जी२० सदस्यांनी सहकार्य करण्याची मागणी मोदींनी केली. पनामा गैरव्यवहारात अडकलेल्यांची नावे माहिती असूनही केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगत तिवारी यांनी टीका केली.