बडय़ा नेत्यांच्या भ्रष्टाचारावर तोफ डागणारे अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विदेशातील भारताच्या लाखो कोटी रुपयांच्या काळ्या पैशाबाबत गौप्यस्फोट केला. ही माहिती आपल्याला केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या एका नेत्यानेच दिल्याचाही दावा त्यांनी केला. त्याच वेळी देशाच्या सार्वभौमत्वासाठी मनमोहन सिंग सरकार धोकादायक ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्विस बँकांमध्ये हवालामार्गे काळा पैसा जमा केला जातो, अशी कबुली तीन जणांनी प्राप्तिकर खात्याच्या चौकशीदरम्यान दिली. भारतात रोख रक्कम दिल्यावर एचएसबीसी बँकेचे प्रतिनिधी स्विस बँकांमध्ये खाते उघडून ही रक्कम डॉलरमध्ये जमा करतात, असेही त्यांनी या चौकशीदरम्यान सांगितले. अंबानी बंधू, नरेश गोयल, बर्मन बंधू आणि बिर्लाच्या घरावर छापे मारून त्यांचा कबुलीजबाब नोंदविला असता तर ते हवाला रॅकेटमध्ये सहभागी आहेत किंवा नाही, याची माहिती हाती लागली असती, असेही केजरीवाल म्हणाले. भारतात आणि भारताबाहेर हवालामार्गे काळा पैसा नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एचएसबीसी बँकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, देशात दहशतवाद, भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीला प्रोत्साहन देणाऱ्या या बँकेचा कारभार रोखावा आणि अमेरिकेने केले त्याप्रमाणे एचएसबीसीचा हात पिरगळून विदेशातील काळ्या पैशाची पूर्ण माहिती सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. मनमोहन सरकारमधील मंत्र्यांनी विदेशात काळा पैसा जमा करणाऱ्यांना पाठीशी घातले, असा आरोप करताना आज राष्ट्रपती असले तरी प्रणब मुखर्जी यांना अर्थमंत्री असताना त्यांनी केलेल्या सारवासारवीचा जाब देशाला द्यावाच लागेल, असेही केजरीवाल म्हणाले.