भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये द्विस्तरीय चर्चेसाठी न्यूयार्कमध्ये तयारी झाली आहे. बैठकीच्या आधी पाकिस्तानने २६/११ मुंबई हल्ल्याची व त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या १६६ लोकांच्या हत्येची जबाबदारी स्विकारावी असे भारताकडून सांगण्यात आले आहे.
यूनोमध्ये मनमोहन सिंग घेणार पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट
“आमच्या बाजूने डॉ. सिंग आणि शरीफ यांच्यामध्ये होणाऱ्या चर्चेची सर्व तयारी करण्यात आली आहे. या चर्चेचा कल काय आहे हे पाकिस्तानला समजण्यासाठी आम्ही काही इशारे दिले आहेत. या चर्चेचा रोख हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडेच आहे. २६/११ मुंबई हल्ल्यामध्ये कोण सहभागी होते, त्यांना कुणी मदत केली, ते पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहेत की पाकिस्तानच्या भूमीत मोकाट फिरत आहेत. यावर चर्चेचा भर राहणार आहे. आम्ही २६/११ मुंबई हल्ल्याची पाकिस्तानने जबाबदारी स्विकारावी या दृष्टीकोणातून या चर्चेकडे पाहत आहोत,” असे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले.   
मात्र, दोन देशांच्या पंतप्रधानांमधील बैठकीमध्ये सर्वच विषय हातळले जाणे शक्य नाही. काही महत्त्वाच्या विषयांवरच चर्चा होणार असल्याचे खुर्शीद म्हणाले.  
“एका बैठकीमध्ये सर्व प्रश्न सुटणार नाहीत. मात्र, आम्ही काही प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा ठेऊन आहोत. दोन्ही देशांची सरकारे आणि नागरिकांच्या भल्यासाठी काही महत्वाचे विषय मार्गी लागणे गरजेचे आहे,” असे खुर्शीद पुढे म्हणाले.
भारताकडून पाकिस्तानच्या आठ सदस्यीय न्यायिक मंडळाला मुंबई हल्ल्यातील काही पुरावे सादर केले जाणार असून, त्यांनी केलेल्या चौकशीची देखील उलट तपासणी केली जाणार असल्याचे खुर्शीद म्हणाले.