गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी घेत असलेल्या अविश्रांत मेहनतीचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कौतुक केले आहे. या दोन्ही राज्यांत काँग्रेस विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजकीय क्षेत्र अत्यंत बेभरवशाचे आहे, केवळ प्रयत्न करावयाचे असतात, असेही डॉ. सिंग म्हणाले. एर्नाकुलम येथील सेंट तेरेसा महाविद्यालयात ‘मॅक्रो इकॉनॉमिक डेव्हलपमेण्ट इन इंडिया : पॉलिसी पस्र्पेक्टिव्ह’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या वेळी डॉ. सिंग वार्ताहरांशी बोलत होते.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाच्या शक्यतेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधी अविश्रांत मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळेल असे वाटते. मात्र राजकीय क्षेत्र अत्यंत बेभरवशाचे आहे, केवळ प्रयत्नच करावयाचे असतात, असेही ते म्हणाले.

नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी याबद्दल जनतेच्या मनात जी संतप्त भावना आहे त्याचे प्रतिबिंब निवडणुकीत उमटेल असे भाकीत वर्तविण्यासाठी आपण प्रेषित नाही, असेही माजी पंतप्रधान म्हणाले.

कलसारिया अपक्ष म्हणून लढणार

अहमदाबाद : गुजरातमधील आम आदमी पक्षाचे नेते कनु कलसारिया यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविण्याची शनिवारी घोषणा केली. भावनगर जिल्ह्य़ातील महुवा मतदारसंघातून सद्भावना मंचकडून ते अर्ज दाखल करणार आहेत. भाजपची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपचा राजीनाम दिलेला नसून, पक्ष नेतृत्वाला अपक्ष म्हणून लढण्याबाबत कल्पना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलसारिया हे तीन वेळा भाजपकडून निवडून आले होते. कलसारिया यांनी २०१४ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.

गुजरातमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेसशी आघाडी

कटिहार (बिहार) : भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी गुजरातमध्ये काँग्रेसशी आघाडी करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. गुजरातचे निकाल म्हणजे केंद्राच्या कामगिरीवरच सार्वमत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने सरचिटणीस तारिक अन्वर यांनी केला. जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे २२ वर्षांत पहिल्यांदाच परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय याच्यावर आरोप झाल्यावर ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा त्याच्या समर्थनार्थ पुढे आली ते पाहता यातून वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा दावा अन्वर यांनी केला. निवडणूक आयोगाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या गटाला संयुक्त जनता दलाचा खरा गट म्हणून मान्यता दिली असली तरी त्याचा फायदा त्यांना मिळणार नाही, असे अन्वर यांनी सांगितले.