भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

“सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला. त्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या असताना त्यांच्यासोबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. सुषमा स्वराज भाजपामध्ये असल्या तरी सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. सुषमा स्वराज उत्तम संसदपटू असण्याबरोबरच प्रतिभावान मंत्री होत्या” अशा शब्दात मनमोहन सिंग यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. आज आपण आदरणीय आणि समर्पित नेत्याला गमावले आहे अशी भावना मनमोहन सिंह यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली.

सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे त्यांचे निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.