धोरणलकव्याच्या मुद्दय़ावरून सातत्याने टीकेचे धनी बनलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. लोकशाही भक्कम करणाऱ्या संस्था मोदींच्या काळात कमकुवत होत असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाची आर्थिक प्रगती होत होती, असा दावा करतानाच आर्थिक विकासात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर होता, असाही दावा मनमोहन यांनी केला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात मोदी यांनी सतत मनमोहन यांना टीकेचे लक्ष्य बनवले. त्यांच्यावर धोरणलकव्याचे आरोप केले. या आरोपांना मनमोहन यांनी बुधवारी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात उत्तर दिले. भाजपप्रणीत रालोआ सरकारने आमच्या योजनांची नावे बदलली, असा दावा मनमोहन यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘माझ्या राजकीय कारकिर्दीत सरकारी यंत्रणेचा मी कधीही स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी अथवा मित्रांसाठी दुरुपयोग केला नाही’. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहन यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर डॉ. सिंह यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. मोदी सरकारच्या काळात आर्थिक आघाडीवर काहीही होत नसल्याचा आरोप सिंग यांनी या वेळी केला. सातत्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर केंद्र सरकार बोलत आहे. परंतु अनेक मुद्दय़ांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनमोहन यांनी केला. मोदींमुळे लोकशाही धोक्यात आल्याचे सिंग म्हणाले. वर्षभरात लोकशाही संस्थांचे अस्तित्व संकटात आले असून एककल्ली विचार व जातीयतावादाची इतिहासात पुनर्नोद होईल, असा इशाराही त्यांनी दिला.