पाकिस्तानातील कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार नसून ते नंतर तेथे सामान्य शीख भाविक म्हणून दर्शनासाठी जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी मात्र मनमोहन सिंग हे सामान्य व्यक्ती म्हणून उद्घाटन कार्यक्रमास येणार असल्याचे म्हटले होते.

कुरेशी यांनी मुलतान येथे शनिवारी असे सांगितले होते,की मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारले असून  ते ९ नोव्हेंबर रोजी कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटन कार्यक्रमास सामान्य व्यक्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत पण  ते प्रमुख पाहुणे नसतील.

दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिल्ली येथे सांगितले, की मनमोहन सिंग हे  कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटन कार्यक्रमास जाणार नाहीत.

पाकिस्तानने पाठवलेल्या निमंत्रणाबाबत त्यांनी म्हटले आहे, की सिंग हे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. ते या ऐतिहासिक धर्मस्थळास सामान्य यात्रेकरू म्हणून नंतर भेट देतील. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनमोहन सिंग यांचा समावेश असेल. ते तेथे जाऊन प्रार्थना करतील व त्याच दिवशी परत येतील. ही मार्गिका कर्तारपूर येथील दरबार साहिब व गुरुदासपूर जिल्ह्यतील डेरा बाबा नानक या दोन ठिकाणांना जोडेल.