टूजी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर तो तातडीने रद्द करा, अशी सूचना आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्या वेळी केली. या सूचनेचा काही प्रमाणात विचार झाला; परंतु याप्रकरणी न्यायालयानेच काही निर्णय घ्यावा, अशी भूमिका तत्कालीन सरकारने केली, असा गौप्यस्फोट माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे केला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरकारने तो व्यवहारच रद्द करायला हवा होता, असेही चिदंबरम् म्हणाले.
राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘२०१४, द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमवेत आयोजित चर्चासत्रात चिदंबरम् बोलत होते. टूजी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न बघता, हा व्यवहारच रद्द करायला हवा होता, असे स्पष्ट मत चिदंबरम् यांनी नोंदविले. सरकारने आर्थिक स्तरावर योग्य निर्णय घेतले असते तर आताच्या निवडणुकीत एवढी नामुष्की झाली नसती, असे मत चिदंबरम् यांनी व्यक्त केले.