जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काँग्रेसकडून काही धोरणे आखण्यात आली आहेत. या धोरणांची अंमलबजावणी व्हावी याकरीता माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील खास शिष्टमंडळ आज जम्मूमध्ये दाखल झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील विविध राजकीय नेते आणि स्थानिक नागरिकांशी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

या शिष्टमंडळामध्ये पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी आणि करन सिंग या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहे. मनमोहन सिंग यांच्या आगमनामुळे जम्मूमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या दौऱ्यामध्ये सिंग हे आपल्या शिष्टमंडळासह राज्यातील राजकीय नेते तसेच स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

जम्मूमध्ये दाखल झाल्यानंतर या शिष्टमंडळाची राज्यातील काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली. हा गट २५ नेत्यांची भेट घेणार आहे. यामध्ये राजकीय नेते आणि मुख्य विरोधीपक्ष नेत्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर जम्मू बार आसोसिएशनचे सदस्य, चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे सदस्य, विस्थापित झालेले काश्मीरी पंडीत आणि पश्चिम पाकिस्तानातील निर्विसितांचाही या भेटीत समावेश असणार आहे.