लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग एकीकडे भाजपविरोधात टीकेचा सूर लावत असतानाच त्यांचे सावत्र बंधू दलजीत सिंग कोहली यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमृतसरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अमृतसरमध्ये ३० एप्रिलला निवडणूक आहे.
कोहली यांच्या भाजपप्रवेशाने पंतप्रधानांच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. कोहली यांच्याशी गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा काहीही संबंध नाही, असे पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. अर्थात कोहली यांना स्वतंत्र राजकीय मते असू शकतात आणि त्यांना हव्या त्या पक्षात ते जाऊ शकतात. भाजप प्रवेशामागे त्यांचा काय हेतू आहे, हे आम्हाला माहीत नाही, असेही सांगण्यात आले.
कोहली हे पंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्य असले तरी आता नातेसंबंध दुरावले आहेत, याची जाणीव मोदींना नसेलही, पण सभेत त्यांनी कोहली यांचे स्वागत करताना नात्याचं महत्त्व जाणीवपूर्वक नमूद केले. कोहली यांना भाजपचे सदस्यत्व देतानाच मोदी म्हणाले की, ‘आम्ही एखाद्याला नुसते सदस्य मानत नाही, त्याच्याशी नातेही जोडतो!’
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि भाजपचे उमेदवार अरुण जेटली यांनी कोहली यांचे व्यासपीठावर स्वागत केले.