‘मन की बात’ च्या ३७ व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. छठ पर्व हा शुद्धीचा पर्व असल्याचे ते म्हणाले. आज त्यांनी ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हा नवा नारा दिला. जवानांबरोबर दिवाळी साजरी करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगत जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांचा अनुभव सर्वांनी जरूर जाणून घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, आपले जवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत. आपले जवान दुर्गम भागात जातात. यात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या वेळी त्यांनी भगिनी निवेदिता यांची आठवण सांगितली. भगिनी निवेदिता यांनी जगभरात आपल्या देशाचे नाव मोठे केले. १८९९ मध्ये जेव्हा प्लेगची लागण झाली तेव्हा त्यांनी स्वच्छतेचे काम केले. त्यांनी आपल्या आरोग्याची चिंता न करता हे काम केले. त्या आरामदायक जीवन जगू शकल्या असत्या. पण त्यांनी सेवेचा रस्ता स्वीकारला.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, जेव्हा एखाद्या मुलाला मधुमेह आहे हे समजते, तेव्हा मला याचे खूप आश्चर्य वाटते. पूर्वी अशा रोगांना राजरोग असे म्हटले जात. कारण हा आजार श्रीमंत आणि ऐशोआराम करणाऱ्यांना होत असत. परंतु, कमी वयात हा आजार होण्याचे कारण म्हणजे खाण्याच्या व जीवनशैलीतील बदल. आपल्याला सवयी बदलण्याची गरज आहे. आयुर्वेद आणि योग कडे उपचार म्हणून न पाहता जीवनाचा एक भागच समजावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताने हॉकीतील आशिया चषकावर पुन्हा नाव कोरले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने क्रीडा जगतातून चांगले वृत्त येत आहे. बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांतने डेन्मार्क ओपनचे विजेतेपद जिंकून भारताची मान उंचावली आहे. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे भारताने आयोजन केले. या खेळातील सहभागी खेळाडूंची जिद्द पाहून मी आश्चर्यचकीत झालो. सर्वांनी चांगली कामगिरी केली, असे ते म्हणाले.

दि. ४ नोव्हेंबरला गुरूनानक जयंती साजरी करणार असल्याचे मोदींनी सांगितले. ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल जयंती आहे. पटेल यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. त्यांनी देशवासियांना नवीन ताकद दिली. जिथे गरज असेल तिथे बल प्रयोग त्यांनी केला, असे त्यांनी यावेळी सांगितले.