आमच्या सरकारसाठी जय जवान, जय किसान हा फक्त नारा नसून मंत्र असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. जमीन अधिग्रहण कायद्याबाबत अफवा पसरवून भ्रम निर्माण करण्यात आल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी राखीपोर्णिमा आणि ओनमच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान विकत घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदनही पंतप्रधानांनी केले.  प्रशासकीय कचाट्यातून बाहेर पडून शेतकऱ्यांना थेट आणि योग्य मोबदला मिळावा यासाठी भू-संपादन विधेयकाचा नवा मसुदा आणला गेला होता. मात्र, विरोधकांनी याविरोधात अफवा पसरवून शेतकऱ्यांनी भयभीत करण्यात काम केलं, असे मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळे यापुढे भू-संपादन विधेयकासाठी अध्यादेश आणला जाणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी केली. गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षण आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आटोक्यात आणण्यास सहकार्य करणाऱ्या गुजरातच्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. तसेच विकास हेच आपल्या सर्व समस्यांचे समधान असल्याचही त्यांनी पुनरूच्चार केला आणि गांधी – पटेलांचा गुजरात शांततेच्या मार्गावर चालेल अशी आशाही व्यक्त केली.
मोदी यावेळी म्हणाले की, जुन्या पिढीला वाटते की नव्या पिढीला काहीही समजत नाही. माझे मत वेगळे आहे. मला तरुणांकडून काहीतरी शिकायला मिळते. समाजासाठी तरुण नवनवे उपक्रम राबवितात. नाशिक येथील दोन भारतीयांनी डॉ.हितेंद्र महाजन आणि डॉ.महेंद्र महाजन यांनी भारताचे नाव गौरवित केले. त्यांनी अमेरिकेत एक स्पर्धा जिंकली. ते आदिवासींसाठी काम करतात. त्यांचे मी अभिनंदन करतो.