प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोह केला. नोटबंदी, जीएसटीपासून ते स्वच्छता अभियानाचा मोदी यांनी उल्लेख केला. सरकारनं अनेक निर्णयांना जनतेची चळवळ केली. स्वच्छताही जनतेची चळवळ झाली, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात देशातील नागरिकांशी संवाद साधतात. प्रजासत्ताक दिनी सायंकाळी मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. मोदी यांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, “आपण नव्या विषयावर चर्चा करणार आहोत. मन की बात हा कार्यक्रम शिकण्यासाठी, सांगण्यासाठी आणि सोबत पुढे जाण्यासाठी उत्तम संधी आहे. प्रत्येक महिन्याला हजारो लोक त्यांच्या सूचना, मेहनत आणि अनुभव येथे सांगतात. देशातील पाणी प्रश्नासंदर्भात जल पुर्नभरणाच्या अनेक कल्पना समोर आल्या आहेत. कोरड्या पडलेल्या हातपंपामध्ये पुन्हा पाणी आणण्यासाठी तामिळनाडूतील जल पुर्नभरणाची एक नवीन संकल्पना मिळाली आहे,” असं मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

खेलो इंडियानंतर सरकारनं खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम्स खेळवणार आहे. ओरिसातील कटक आणि भुवनेश्वर येथे ही क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत तीन हजार खेळाडू पात्र ठरले आहेत.

सरकारनं हाती घेतलेल्या अभियान पुढे लोकचळवळ बनले. देशात स्वच्छतेविषयी राबवण्यात आलेलं अभियान जनतेची चळवळ झाले आहे.

काही दिवसापूर्वी सण उत्सवाची धूम सुरू होती त्यावेळी दिल्ली एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार बनली. गेल्या २५ वर्षापासून सुरू असलेल्या ब्रू समुदायाचा त्रासदायक प्रवासाला पूर्णविराम मिळाला. सरकारने केलेल्या करारानुसार ३४ हजार ब्रू समाजातील शरणार्थींना त्रिपुरामध्ये घरं दिली जाणार आहे. यामुळे त्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली आहे.

आपण २१व्या शतकात जगत आहोत. हे शतक विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाहीचं युग आहे. आपण कधी अशा ठिकाणाचं नाव ऐकलं आहे का? जिथे हिंसेमुळे जीवन चांगलं झाल आहे? हिंसा कोणत्याही समस्येचं समाधान नाही.

पद्म पुरस्कारासाठी यावर्षी तब्बल ४६ हजार अर्ज आले होते. ही संख्या २०१४च्या तुलनेत २० टक्के अधिक आहे. ही आकडेवारीच जनतेला विश्वास देत आहे की, पद्म पुरस्कार जनतेचे पुरस्कार बनले आहेत.