पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी ‘मन की बात’मधून संवाद साधला. देशासमोर उभ्या असलेल्या करोना संकटापासून ते योग दिनापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं. देशानं करोनाविरोधात एकजुटीनं लढा दिला आहे. आता लॉकडाउन शिथिल होत असून आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.

Live Blog

11:42 (IST)31 May 2020
नाशिकच्या राजेंद्र जाधवांचं मोदींकडून कौतुक

करोनाविरोधातील लढ्यात अनेकजणांनी स्वतःला वाहून घेतलं आहे, असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कौतुक केलं. "नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनं गावात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून टँकरनं सॅनिटायझर फवारणी करत आहे," असं मोदी म्हणाले.

11:40 (IST)31 May 2020
दोन फूट अंतर आणि चेहऱ्यावर मास्क

देश करोनाविरोधातील लढा गांभीर्यानं लढत आहे. त्यामुळे त्याविषयीची जाणीव पुढील काळातही ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे दोन फूट अंतर, तोंडावर मास्क आणि सतत हात धूत राहावं. आपल्या माणसांसाठी आणि देशासाठी आपण हे करूया, असं आवाहन मोदी यांनी केलं.

11:34 (IST)31 May 2020
पाण्याचा थेंब थेंब जिरवूया

आपण जल है तो जीवन है, जल है तो कल है, असं नेहमी म्हणत असतो. आपण सर्वांनी पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवायला हवा. तापमान वाढत असून, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, असं आवाहन मोदी यांनी केलं.

11:25 (IST)31 May 2020
प्रामाणिक करदात्यांचंही श्रेय

आयुषमान भारत योजनेतून अनेक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांनी उपचार घेतले. देशात अनेकांना या योजनेचा फायदा झाला आहे. याच श्रेय देशातील प्रामाणिक करदात्यांचंही आहे. त्यांनी कर दिल्यामुळे गरिबांना उपचार घेता येत आहे.

11:19 (IST)31 May 2020
माय लाईफ माय योग

जागतिक योग दिवस जवळ येत आहे. भारतानं जगभरात योग पोहोचवला. आयुष मंत्रालयानं एक ब्लॉग सुरू केला आहे. माय लाईफ माय योग. त्यातून स्पर्धा घेण्यात येणार असून, योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटाच्या व्हिडीओतून सांगायचं आहे.

11:16 (IST)31 May 2020
आत्मनिर्भर भारत देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल

आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मेक इन इंडियासह अनेक जण उद्योग सुरू करत आहे.

11:13 (IST)31 May 2020
मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या

मागील काही वर्षात विकासाच्या दृष्टीनं भरपूर काम झालं आहे. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झालं आहे. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.

11:11 (IST)31 May 2020
गरीब, श्रमिकांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे

करोनाचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे. रेल्वेचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाही श्रमिकांना घरी सोडत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

11:09 (IST)31 May 2020
लोक डिस्टन्स पाळलं जावं म्हणून प्रयत्न करत आहेत

सोशल मीडियावर अनेक दृश्य पाहत आहे. दुकानदारही खबरदारी घेत आहे. फिजिकल डिस्टन्स पाळलं जावं म्हणून अनेक युक्त्या लढवल्या जात आहे. करोनाच्या विरोधात हे खुप वेगळं आहे.

11:07 (IST)31 May 2020
देशात अनेकांनी स्वतःला सेवेत वाहून घेतलं आहे

भारतात करोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही.वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणाऱ्यांची नाव घेऊ शकत नाही.

11:05 (IST)31 May 2020
आता अधिक सर्तक राहण्याची गरज -मोदी


करोनाच्या काळातही मन की बात सुरूच राहिली. आता अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. श्रमिक रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता अधिक सर्तक राहण्याची गरज आहे. देशात करोनाविरोधातील लढाई मजबूत लढवली जात आहे.

10:51 (IST)31 May 2020
आईला लिहिलेल्या पत्रांवर करू शकतात भाष्य

करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थचक्र रुतून बसलं होतं. त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यातील विविध घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. 'आत्मनिर्भर भारत अभियानाची' घोषणा करत केंद्रानं हे पॅकेज जाहीर केलं होतं. त्याविषयीही मोदी भाष्य करू शकतात. त्याचबरोबर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली असली, तरी नव्या लॉकडाउनबद्दल मोदी देशवासीयांशी बोलू शकतात. तसेच आरोग्याची काळजी घेऊन कोणत्या गोष्टींचं सहकार्य सरकारला करावं, याबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मोदी यांनी आईला लिहिलेल्या पत्रांचं पुस्तक अलिकडेच प्रकाशित झालं आहे. त्याबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

10:50 (IST)31 May 2020
लोकांकडून मागवले होते विषय आणि सूचना

पंतप्रधान प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील नागरिकांशी 'मन की बात' करतात. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं देशातील लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. धार्मिक स्थळांसह देशातील अनेक सेवा सुरू करण्यास केंद्रानं अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमासंदर्भात काही सूचना आणि विषय लोकांकडून मागितले होते. त्यातील कोणत्या विषयावर मोदी मार्गदर्शन करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.