News Flash

जलसंवर्धनासाठी उपाययोजना करा

‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे आवाहन; हिवरेबाजारमधील योजनांचे कौतुक

| April 25, 2016 01:36 am

पंचायत राज व्यवस्थेचे प्रभावी विकेंद्रीकरण केल्याबद्दल महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. जमशेदपूर येथे रविवारी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी  पुरस्कार स्वीकारला.

‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे आवाहन; हिवरेबाजारमधील योजनांचे कौतुक

देशाच्या अनेक भागांत भीषण दुष्काळ असून जलसंवर्धनावर लोकांनी भर दिला पाहिजे, किंबहुना त्यासाठी सामूहिक चळवळ उभी राहिली पाहिजे, त्यासाठी अजून दीड महिना हातात आहे, त्यात काही कामे केली तर पाऊस पडल्यानंतर पाणी साठवता येईल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात केले. मान्सूनचा पाऊस ११० टक्के होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तो खरा ठरून चांगला पाऊस पडावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मन की बात कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, गंगा, यमुना नद्या स्वच्छ केल्या पाहिजेत, काही काळातच त्याबाबत सरकारने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसतील. मुंबईच्या एका महिलेने शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर ते म्हणाले की, दर्जेदार शिक्षण हे पटसंख्येइतकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आता त्यावर भर दिला जाईल. नेहमीच्या शिक्षणाबरोबरच कौशल्यांचे शिक्षण दिले पाहिजे. १ कोटी लोकांनी गॅसचे अनुदान सोडून दिले त्याबाबत त्यांनी आभार मानले व प्रसारमाध्यमांनी सकारात्मक बातम्याही द्याव्यात असे आवाहन केले.

देशात दुष्काळ तर आहेच, पण धरणातील पाणी खूपच कमी आहे ही चिंतेची बाब आहे. पाऊस पडला असे गृहीत धरले तरी लोकांनी आता खेडय़ापाडय़ातून पाणी साठवण्यासाठी पुढे आले पाहिजे. पाणी वाचवलेही पाहिजे. आता दुष्काळ असला तरी अजून दीड महिना आपल्या हातात आहे, त्यात पाणी साठवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्य़ात २७ शेततळी बांधली आहेत. आणखी बांधण्याचे काम चालू आहे त्यामुळे भूजलपातळी वाढली आहे.

लातूरला पाणी देणाऱ्या रेल्वेचे कौतुक

रेल्वेने लातूर जिल्ह्य़ात पाणी पोहोचवण्याचे जे प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहेत, पण देशात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाचे प्रयत्न होत आहेत त्यांचेही कौतुक झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

गंगा स्वच्छ करण्याचे प्रयत्न तीस वर्षे सुरू आहेत. अनेक सरकारे आली व गेली, पण गंगा मैलीच आहे. लोकांच्या सहभागाशिवाय हे काम होणार नाही. आम्ही प्रयत्न करू, पण समाजानेही त्यासाठी पुढे आले पाहिजे.

हिवरेबाजारचे उदाहरण

अहमदनगर जिल्ह्य़ात हिवरेबाजार नावाचे गाव आहे. त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी पीक पद्धती बदलली आहे व पाण्याचा योग्य वापर केला आहे. ठिबकसिंचनाचा वापर करून तेथे पाणी वाचवले आहे, जलपुनर्भरण, जलसंवर्धन हे उपाय तर केले जात आहेत, पण उसाच्या मागे न लागता भाजीपाला व फ ळझाडांची लागवड केली जात आहे, असे ते म्हणाले.

सरकारी अधिकाऱ्यांनी रोज एक चांगली बातमी पोस्ट करावी असे आवाहन एका श्रोत्याने केले होते त्यावर मोदी म्हणाले की, चांगली बातमी ही प्रेरणा असते, त्यामुळे चांगल्या बातम्या लोकांपुढे आल्या पाहिजेत.

विकासात ग्रामपंचायतींची सक्रिय भूमिका हवी -मोदी

जमशेदपूर: विद्यमान सरकारने सुरू केलेल्या योजनांचा फायदा घेऊन ग्रामपंचायतींनी विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकशाही मजबूत करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.   अगदी दूरवरच्या भागांपर्यंत सर्व आधुनिक सोयीसुविधा पोहोचतील हे निश्चित करून शहरे व ग्रामीण भाग यांच्यातील दरी कमी करण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि मुले यांच्यावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागाचा विकास साधायला हवा, असे पंतप्रधानांनी ‘पंचायत दिवसा’च्या कार्यक्रमात सांगितले. पंचायत व्यवस्था बळकट करणे आवश्यक असून ग्रामसभा या संसदेइतक्याच महत्त्वाच्या आहेत, असे ‘ग्राम उदय से भारत उदय’ या दहा दिवसांच्या मोहिमेच्या समारोपानिमित्त  कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:36 am

Web Title: mann ki baat pm modi shares drought concern pitches for mass campaign to save water
Next Stories
1 नितीशकुमारांवर पासवान यांची टीका
2 उत्तराखंडचा मुद्दा गाजण्याची चिन्हे
3 इंडिया गेट येथील महाराष्ट्र सरकारच्या जागेवरचा दावा न्यायालयाने फेटाळला
Just Now!
X