रोख रक्कमेचा वापर कसा कमी होईल याचा विचार केला जात असून कॅशलेस सोसायटीच्या दिशेने जगाचा प्रवास सुरु आहे. जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ‘कॅशलेस‘ व्यवस्था काळा पैसा रोखेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी मन की बात केली. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी पंतप्रधान मन की बात मधून देशवासियांना संबोधित करतात.
पाणी आणि जंगलाचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळयाच्या चार महिन्यांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले.  पंतप्रधान म्हणाले की, पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करीन की, त्यांनी पाणी वाचवण्यासाठी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी. दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी चांगले उपाय योजले, गुजरात आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग केला असेही मोदींनी सांगितले. तसेच, शालेय परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नयेत असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.