गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्याची गरज भासल्यास मनोहर पर्रिकर यांना अमेरिकेत नेण्यात येईल आणि त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती गोव्याचे उप सभापती आणि भाजप आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे. मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आवश्यकता भासल्यास त्यांना अमेरिकेतही उपचारांसाठी पाठवण्यात येईल अशी माहिती लोबो यांनी गोवा विधानसभेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा त्रास होतो आहे. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी मनोहर पर्रिकरांची भेट घेतली. त्यांची प्रकृती सुधारेपर्यंत त्यांना रुग्णालयातून डीस्चार्ज देता येणार नाही असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. मनोहर पर्रिकर उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत अशीही माहिती रूग्णालयाने दिली आहे. त्यांच्याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे पत्रकच लीलावती रूग्णालयाने रविवारी प्रसिद्ध केले.

प्रसारमाध्यमांमध्ये मनोहर पर्रिकर यांच्या आजारासंबंधी काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या बातम्यांना काहीही अर्थ नाही. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि लवकरच गोव्यात परततील असा विश्वास भाजप कार्यकर्ते सुनील देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच देसाई यांनी अज्ञातांविरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्याप्रकरणी पोंडा या पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे. तर गरज पडल्यास मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी अमेरिकेत पाठवले जाईल असे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले आहे.