तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोसहाली यांच्या खळबळजनक वकव्यानंतर केंद्र सरकार त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर २०१४ला मध्यरात्री भारतीय हद्दीत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेली संशयित पाकिस्तानी नौका आपणच स्फोट करून उडवून देण्यास सांगितले होते. आपल्याला त्यांचा (पाकिस्तानचा) बिर्याणी खायला घालून पाहुचणार करायचा नव्हता, असे सांगत आपण पाकची नौका उडवण्याचे आदेश दिल्याचे विधान लोसहाली यांनी केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ वेगाने प्रसारित झाल्यावर त्यांची चौकशी करण्यात येईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले. संशयित नौकेने स्वतःहून पेट घेतल्याच्या विधानावर पर्रिकर ठाम आहेत. त्या बोटीवर दहशतवादी असल्याची माहिती त्यांनी याआधीच दिली होती. लोसहाली यांनी केलेले निवेदन चुकीचे आणि दिशाभूल करणारे असून, त्यांची चौकशी करून गरज पडल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही पर्रिकर म्हणाले.
‘त्या रात्री मीच पाकची नौका उद्ध्वस्त करायला सांगितले होते’
३१ डिसेंबरच्या रात्री गुजरातच्या सागरी क्षेत्रात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी नौकेचा मुद्दा मध्यंतरी चांगलाच गाजला होता. या एकूणच प्रकारावर संशयाचे मोठे सावट होते. त्यावेळी भारतीय नौदलाकडून पाठलाग सुरू असताना, नौकेवरील लोकांनी स्वत:हून नौका पेटवली किंवा स्फोटकांनी उडवून दिल्याचा दावा भारतीय यंत्रणांकडून करण्यात आला होता. मात्र, त्यावेळीही प्रसारमाध्यमांकडून या घटनेच्या स्वरूपाविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली होती. एखाद्या लहानशा नौकेचा पाठलाग करण्यासाठी नौदलाने एवढ्या ताकदीचा वापर का करावा, हा मुद्दादेखील उपस्थित झाला होता. त्यामुळे आता लोसहाली यांच्या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.