तामिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री मनोरमा (वय ७८) यांचे येथे खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा भूपती आहे. शनिवारी रात्री बारा वाजता त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. मनोरमा यांनी १२०० तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या व सहा दशकांच्या काळात एम. जी. रामचंद्रन व शिवाजी गणेशन यांच्या बरोबरीने भूमिका केल्या. त्यांनी हजारहून अधिक चित्रपटात भूमिका केल्याने त्यांच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली होती. पाच मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या होत्या हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़ होते.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई व माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केल्या होत्या. एम. जी. रामचंद्रन व श्रीमती जयललिता यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. दोघेही नंतर मुख्यमंत्री झाले. मनोरमा यांनी एन. टी. रामाराव यांच्या समवेत तेलगु चित्रपटातही काम केले. त्यावेळी रामाराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. आची म्हणजे आई या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. त्यांनी नाटकातही आपली कारकीर्द गाजवली होती. तामिळनाडूत तंजावर जिल्ह्य़ात काशी किलाकुदायार व रमामिर्थम या आई-वडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव गोपीशांता असे होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी अभिनयात पदार्पण केले. नाटय़ दिग्दर्शक थिरुवेंगडम व हार्मोनियम वादक त्यागराजन यांनी त्यांचे नाव मनोरमा असे ठेवले. नंतर त्या चंदेरी दुनियेत आल्या. मालायित्ता मंगाई हा त्यांचा पहिला चित्रपट १९५८ मध्ये आला. त्यात त्या नायिकेच्या भूमिकेत होत्या. त्यांनी चित्रपटांसाठी स्वरसाजही दिला. त्यांनी तामिळ चित्रपटात भूमिका केल्या तरी तेलगू, हिंदी, मल्याळम व कन्नड चित्रपटातही त्यांनी काम केले. थिल्लाना मोहनाबल या तामिळ चित्रपटात त्यांनी काम केले त्याची प्रशंसा झाली. त्यांना २००२ मध्ये पद्मश्री सन्मान देण्यात आला व पुडिया पथाई चित्रपटासाठी १९८९ मध्ये उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.