आयझॅक न्यूटन यांच्यापूर्वी कितीतरी आधी वेदांमधील मंत्रांमध्ये गतीचे नियम सांगितले आहेत, असा दावा देशाचे शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी त्यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला आव्हान देत मानवाची उत्पत्ती ही माकडांपासून झाली नसल्याचा दावा करीत त्यासाठी वेदांचा संदर्भ दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा असाच कित्ता गिरवाला असून यंदा न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान दिले आहे.

१५ आणि १६ जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. न्यूटनने गतीच्या नियमांचा शोध लावण्यापूर्वीच मंत्रांमध्येच गतीविषयक नियमांचा उल्लेख होता. त्यामुळे पारंपारिक ज्ञानाची आपल्य़ा शिक्षणपद्धतीत समावेश आवश्यक आहे, अशी चर्चा बैठकीत झाली होती. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

जानेवारी महिन्यांतच सिंह यांनी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा चुकीचा असून शाळा आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून तो हटवण्यात यायला हवा असे त्यांनी म्हटले होते. पृथ्वीवर मानवाचा जन्म मानव म्हणूनच झाल्याचा दावा त्यांनी केला होता. यासाठी वेदांमध्ये मानव माकडांपासून तयार झाल्याचे म्हटलेले नाही, असा दाखला त्यांनी दिला होता.

तसेच या बैठकीत असेही सूचवण्यात आले की, देशभरातील शाळांमध्ये हजेरी देताना ‘येस सर’ म्हणण्याऐवजी ‘जय हिंद’ बोलण्यात यावे. त्याचबरोबर राष्ट्रगीत म्हणणे आणि राष्ट्रध्वज फडकावणेही शाळांना बंधनकारक करण्यात यावे अशीही चर्चा झाल्याचे कळते. त्यासाठी शाळांचा अभ्यासक्रम हा संस्कृतीवर आधारीत शिक्षण असावा असे मध्यप्रदेशातील मंत्री कुंवर विजय शहा यांनी या बैठकीत सुचवले होते.