उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांमुळे येत्या पाच वर्षांत भारतातील उत्पादन क्षेत्रात ५२० अब्ज डॉलर्सची वाढ होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

एका वेबीनारमध्ये त्यांनी सांगितले की, सरकार देशांतर्गत उत्पादन क्षेत्रातील सुधारणांना प्रोत्साहन देत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात २ लाख कोटी रुपये उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांकरिता ठेवलेले आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत उत्पादन क्षेत्रात ५२० अब्ज डॉलर्सची वाढ अपेक्षित आहे. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांमुळे सध्या अनेक क्षेत्रांतील रोजगार वाढणार असून फायदेही दुप्पट होतील. सरकारने अनुपालनाचे ओझे कमी केले असून उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे उद्योगातील इतर खर्च कमी होणार आहे.

उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेमुळे दूरसंचार, वाहन उद्योग, औषध उद्योग या क्षेत्रातही विस्तार करणे शक्य होणार आहे. यातून निर्यातीलाही उत्तेजन मिळणार आहे. करोनामुळे सध्याच्या काळात उत्पादन क्षेत्रावर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे तो दूर होण्यास उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांनी फायदा होणार आहे.