बंड करुन भाजपातून बाहेर पडलेले नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनीही शनिवारी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. राजस्थानात एका सार्वजनिक सभेत जनतेला संबोधित करताना ‘कमल का फूल, बडी भूल’ असे म्हणत त्यांनी भाजपा सोडत असल्याची घोषणा केली.


राजस्थानमधील बारमर जिल्ह्यातील पंचपद्र येथे काढलेल्या स्वाभिमान रॅलीत मानवेंद्र सिंह बोलत होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, मी आता भाजपाचा सदस्य नाही. मात्र, त्यानंतर आता काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचे की नाही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. माझ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. ते जे सांगतील तेच मी करणार आहे. त्यांचा निर्णय हा माझा निर्णय असेल त्यासाठी प्रत्येकाकडे मी याबाबत विचारणा करणार आहे.

भाजपाने जसवंत सिंह यांना २०१४ च्या निवडणुकीत बारमेर या पारंपारिक मतदारसंघातून तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्यांनी भाजपाविरोधात बंड केले होते. त्याच वर्षी मानवेंद्र यांनी त्यांच्या वडिलांसाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मोहिम सुरु केल्याने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व भाजपाने रद्द केले होते. मात्र, त्यानंतरही सिंह यांचे कुटुंबिय भाजपामध्येच होते. मात्र, आता त्यांच्या मुलानेही पक्षाला रामराम ठोकला आहे.

पुढील वर्षी राजस्थानात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर मानवेंद्र आता भाजपाला सोडून इतर कोणत्या पक्षात जातात हे पाहणे महत्वाचे आहे.