पश्चिम बंगालमधील गंगासागर यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. गंगासागर यात्रेतून भाविक माघारी परतत असताना कोचुबेरिया घाटाजवळ चेंगराचेंगरी झाल्याने ही दुर्घटना घडली. मकरसंक्रातीच्या निमित्ताने गंगासागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

‘यात्रेवरुन परतत असताना जेट्टीजवळ लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे काही लोकांनी घाई केल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. कोचुबेरिया घाटाजवळीत पाचव्या जेट्टीवर चेंगराचेंगरी झाली,’ अशी माहिती सुंदरबन विकास मंत्री मंटुराम पाखिरा यांनी दिली. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. बोटीसाठी रांगेत उभ्या असलेल्या अनेकांनी एकाचवेळी बोटीत शिरण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाल्याने सर्व प्रकार घडला. बोटीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे मध्यम वयीन असल्याची माहिती समोर येते आहे. मात्र अद्याप या व्यक्तींची ओळख पटलेली नाही. या चेंगराचेंगरीनंतर काही लोक बुरीगंगा नदीच्या पाण्यात पडले असण्याची शक्यता आहे. यासाठी सध्या शोध कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.