अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री एका लग्न समारंभादरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या भीषण आत्मघाती बॉम्बस्फोटात 63 जणांचा मृत्यू झाला असून 183हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. “अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बॉम्बस्फोट झाला त्या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची भीती अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे.