हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. या घटनेचे वृत्त वेगाने माध्यमांतून प्रसारीत झाल्यानंतर त्यावर समाजातील विविध घटकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणामधील पीडितेच्या आईनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबादच्या पीडितेला १० दिवसांत न्याय मिळाला याचा आनंद झाला. तसेच आरोपींचा एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद, असे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.

निर्भयाच्या आई म्हणाल्या, “या प्रकरणातील आरोपींनी कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच ते पोलिसांवर दगडफेक करीत होते. इतके ते निर्ढावलेले असल्यामुळे त्यांना जी शिक्षा दिली ती योग्यच आहे. त्यामुळे यापुढे गुन्हेगार पोलिसांसोबत असे चुकीचे कृत्य करणार नाहीत. या कामगिरीसाठी मी पोलिसांना खूप खूप धन्यवाद देते. प्रत्येक ठिकाणच्या पोलिसांनी अशाच प्रकारे काम करायला हवं. पोलिसांनी आपल्या या कामगिरीद्वारे एक चांगला पायंडा पाडून दिला आहे. पोलिसांनी जे केलंय ते योग्य केलंय त्यामुळे आता त्यांचे हात बांधण्याचे प्रयत्न होऊ नयेत.”

“मी दिसते की मी जिवंत आहे मात्र, मी रोज मरत आहे. गेल्या सात वर्षांपासून मी न्यायासाठी संघर्ष करीत आहे. या देशातील न्यायव्यवस्थेला आणि सरकारला मी आवाहन करते की निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी. तसेच मी समाजाला आवाहन करु इच्छिते की ज्या मुलींवर अमानुष अत्याचार होऊनही आरोपी जिवंत आहेत, अशा आरोपींना सरकार अद्याप तुरुंगात का पाळत आहेत? असा प्रश्न प्रत्येकानं विचारायला हवा. निर्भयाच्या आरोपींना आणि देशातील अशा प्रकरणांतील सर्व आरोपींना फाशी द्यावी” असेही त्यांनी म्हटले आहे.