पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघाती आरोप

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याने जे आक्रंदन करीत आहेत ते माओवादी आणि दहशतवादी यांचेच समर्थक आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीदरम्यान केला.

ते म्हणाले, ‘‘दहशतवादाने कित्येक दशके भरडल्या गेलेल्या काश्मीरमधील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. हितसंबंधांत बाधा आलेले गट, सत्ता ही आपल्याच घराण्याची मक्तेदारी असल्याचे मानणारी कुटुंबे आणि दहशतवाद्यांबाबत पुळका असलेले लोक यांचा या निर्णयाला विरोध अपेक्षितच होता.’’

काश्मीरसंबंधातील निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका करताना मोदी म्हणाले की, ‘‘ते हेच लोक आहेत जे सर्वसामान्य माणसाचे ज्यातून भले होईल, अशा प्रत्येक गोष्टीला विरोध करतात.

लोकांची तहान भागवण्यासाठी एखादा प्रकल्प उभा राहत असेल, त्याला ते विरोध करतात. रेल्वे मार्ग बांधायचा असेल, तर ते विरोधात उभे ठाकतात. सर्वसामान्य माणसाची ससेहोलपट करणाऱ्या माओवादी आणि दहशतवादी यांच्यासाठीच त्यांच्या हृदयाचे ठोके पडत असतात.’’

काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आणि राज्याच्या विभाजनानंतर मोदी यांनी ‘दूरदर्शन’वरून देशाला उद्देशून जाहीर संदेश दिला होता. त्यात त्यांनी काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत दिले होते. काश्मीरमधील जनतेला तरुण लोकप्रतिनिधी, तरुण आणि नवे मुख्यमंत्री निवडता यावेत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

संदेशात आदरभाव..

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर देशाला उद्देशून मोदी यांनी जाहीर संदेश दिला होता. त्यात त्यांनी, ‘‘या निर्णयाला असलेल्या विरोधाची मला जाणीव आहे आणि त्या विरोधाचा मी आदरही करतो. त्यांच्या आक्षेपांचे निराकरण केले जाईल, पण त्यांनी देशहितही लक्षात घ्यावे,’’ अशी भावना व्यक्त केली होती.

आढावा सुरू

काश्मीर खोऱ्यातील प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्याबाबत तसेच इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे, असे  वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन  परिस्थितीचा आढावा घेत असून खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविले जाणार आहेत, असे श्रीनगरमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीरबाबतचा हा निर्णय कोणताही राजकीय हेतू बाळगून घेतलेला नाही, तर केवळ देशहित लक्षात ठेवूनच घेतला आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान