बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांनी आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे अपीलही केले आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये ‘आऊटसोर्सिंग’मध्ये आरक्षण दिल्यानंतर नितीश यांनी या दिशेने अचानक आक्रमक पवित्रा घेतला आहे. नितीश यांचे हे राजकीय पाऊल असल्याचेही मानले जाते. संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजय होईल, असा दावा केला आहे. ज्या पद्धतीने जनतेकडून अभिप्राय मिळत आहेत, त्यावरूनतरी भाजपचा सहज विजय होईल, असे ते म्हणाले. नितीश यांच्या वक्तव्यानंतर गुजरातमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयू गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. गुजरातमध्ये जनाधार पूर्वीपेक्षा चांगला आहे, त्यामुळे पक्ष येथून निवडणूक लढेल असे सांगण्यात आले होते. परंतु, नितीश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर जेडीयू निवडणूक लढवण्याची शक्यता कमी मानले जाते. यापूर्वीही जेडीयूने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी माघार घेतली होती.

दरम्यान, नितीश कुमार यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये देशातील सर्व ऊर्जा मंत्र्यांची दोन दिवसांची परिषद केंद्र सरकारने अचानक रद्द केली होती.