24 April 2019

News Flash

मराठा मोर्चात फूट?; राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध

वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट

Maratha Kranti Morcha : (संग्रहित छायाचित्र)

राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नाही. राजकीय पक्ष स्थापून समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व अन्य मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची गुरुवारी (दि.८) रायरेश्वर येथे स्थापना करण्यात आली. मराठा शब्दाचा वापर करून राजकीय पक्ष स्थापन करण्यास विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव रायरेश्वर येथे पोहचले होते. रायरेश्वर येथे पोलीस व संबंधित पक्षाचे सुरेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या नावात मराठा शब्दाचा वापर नसल्याचे सांगितले. मात्र, राजकीय पक्ष स्थापून व आंदोलनात राजकारण आणून सरकारच्या माध्यमांतून सुरेश पाटील समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाने आंदोलनात फूट पाडण्यासाठी समाजाच्या विरोधात डाव रचला आहे, असा आरोप यावेळी शिरसाठ आणि माशेरे यांनी केला.

दरम्यान, वाईमार्गे पुण्याकडे जात असताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नानासाहेब माशेरे (पुणे), बापूसाहेब शिरसाठ (जळगाव), महेश राणे (मुंबई), संजय सावंत, श्रीकांत माने (औरंगाबाद), संदीप तुपे (जालना) आदींनी वाई येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ९ ऑगस्ट २०१६ रोजी पहिल्यांदा कोपर्डी येथील पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. पुढे मराठा क्रांती ठोक मोर्चा, महिला व युवा मोर्चा निघाले. या सर्व मोर्चांना राज्यासह देशभरातून बहुजन मुस्लिमांसह सर्व समाजानेही मोठ्या प्रमाणावर समर्थन व पाठींबा दिला. समाजाच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजपाने व सरकारमधील मंत्र्यांनी इतर समाजातील हस्तकांना हाताशी धरून आंदोलन फोडण्याचे काम केले.

तसेच मराठा आंदोलनामुळे गावागावात इतर समाज असुरक्षित झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात करत दलित, मुस्लीम, बहुजन समाज आदींच्या नावाने मोर्चे काढले. मराठा समाजाच्या मोर्चातून १३ हजार ७०० युवकांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले, तर ३७ तरुण मृत्यू पावले. स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले. सीसीटीव्हीत नोंद असल्याचे सांगत या युवकांवरील गुन्हे सरकार मागे घेण्यास नकार देत आहे. ज्या युवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशांचे गुन्हे मागे घ्यायलाच हवेत. अशा अनेक बाबींमुळे समाजाच्या मनात न्याय हक्कासाठी लढण्याची तयारी आहे, यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष काढण्याची गरज नाही.

First Published on November 9, 2018 7:25 pm

Web Title: maratha split maratha community opposed to form a political party