माजी कॅग विनोद राय यांच्यावर खटला चालविण्याचीही मागणी

तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारच्या मानगुटीवर बसलेल्या टूजी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्वाची पुराव्यांअभावी सुटका झाल्याने काँग्रेसला गुरुवारी हर्षोल्हास झाला. गैरव्यवहार नसल्याचे सिद्ध झाल्याचे सांगताना पी. चिदम्बरम, कपिल सिब्बल हे तत्कालीन मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली यांच्यावर अक्षरश: तुटून पडले. त्याचबरोबर टूजीमध्ये १ कोटी ७६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल देणारे माजी महालेखापाल व नियंत्रक (कॅग) विनोद राय यांच्यावर तर खटला चालविण्याची मागणीही पक्षाने केली.

‘टूजीमध्ये मनमोहन सिंग सरकारमधील कोणीही वरिष्ठ सहभागी नव्हते. त्या आरोपांमध्ये तथ्य नव्हते. ते खरे नव्हते आणि ते आज सिद्ध झाले,’ अशी टिप्पणी चिदम्बरम यांनी केली. ते त्या वेळी अर्थमंत्री होते. याउलट ए. राजा यांच्यानंतर दूरसंचार मंत्रिपद सांभाळणारे सिब्बल जास्त आक्रमक होते. गैरव्यवहार नसल्याचे आम्ही ठामपणे सांगत होतो; पण भाजपने ‘कॅग’च्या अहवालाला हाताशी धरून आम्हाला बदनाम केल्याचे ते म्हणाले. त्यांनी जास्त लक्ष्य केले ते राय यांना. त्यांच्या अहवालामुळे देशाची बदनामी झाली. आज दूरसंचार क्षेत्र अडचणीत सापडले ते त्यांच्यामुळे आणि त्यांचा वापर करणाऱ्या भाजपमुळे. आता तरी राय यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

ईडी आदेशाविरुद्ध अपिलात जाणार

नवी दिल्ली : टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व म्हणजेच १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधांत सक्तवसुली संचालनालय (ईडी) अपिलांत जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.विशेष न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून ईडी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार आहे. मात्र ईडी निश्चित कोणत्या कारणास्तव न्यायालयात जाणार आहे ते लवकरच स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.