विकासाच्या ज्या प्रारूपाचा भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला त्या भागांमध्ये आज गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. गुजरातमधील विकास पोकळ असल्याचे दाखवण्यासाठी राहुल गांधी यांनी ज्या साणंदकडे बोट दाखवले होते आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या भेटीदरम्यान ज्या मंडल बेचराजी विकास प्रकल्पाची चर्चा झाली त्या मतदारसंघांमधील मतदारांना या विकासाविषयी नेमके काय वाटते हे आजच्या मतदानातून पुढे येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दहा वर्षांपूर्वी साणंदच्या औद्योगिक विकासाला सुरुवात झाली तरीही पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये येथे काँग्रेस विजयी ठरली. तीच गत वीरमगामची. पाच वर्षांपूर्वी बेचराजीमधून मात्र भाजपचा उमेदवार विजयी झाला होता.

अहमदाबादचे मोठे रस्ते, पूल यांच्या जंजाळातून बाहेर पडले की शेतशिवारांमध्ये वसलेली अनेक गावे दिसू लागतात. या सर्व गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज पोहोचवल्याचा दावा गुजरात सरकार करत असले व तो खराही असला तरी शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये विकासाची गंगा पोहोचलीच नसल्याचे दिसते. साणंदमध्ये शेकडय़ाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या येऊनही स्थानिकांना रोजगार मिळाला नसल्याची तक्रार गावकरी करतात तर बेचराजी परिसरात तर शेतजमिनी देण्यास जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारवर औद्योगिक क्षेत्र आकुंचित करण्याची वेळ आली. सप्टेंबर महिन्यात जपानचे पंतप्रधान शिंझो आबे गुजरातच्या भेटीवर आले तेव्हा त्यांनी बुलेट ट्रेनसोबतच भारत-जपान औद्योगिक क्षेत्रासाठी मंडल-बेचारजी येथील विशेष गुंतवणूक प्रदेशाबाबतही चर्चा केली. सुरुवातीला गुजरात सरकारने मंडल-बेचराजी परिसरातील ४४ गावांमध्ये हे औद्योगिक क्षेत्र स्थापण्याचा विचार केला होता. मात्र पाच वर्षांपूर्वी शेतजमिनी विकण्यास गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे पूर्वीच्या ५०२ चौरस किलोमीटरऐवजी आता आठ गावांमधील १०२ चौरस किलोमीटर परिसरात हे विकासक्षेत्र होत आहे. या विकासाबाबत गुजरातमध्ये डांगोरा पिटला जात असला तरी प्रत्यक्ष येथील स्थानिकांचे त्याबाबतचे मत दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये दिसणार आहे.

पाच वर्षांपूर्वी अहमदाबाद, बडोदा या शहरांमधील २३ पैकी २० जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. शिवाय हिंदूुत्वाचा मुद्दाही प्रबळ आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील बालेकिल्ला टिकवणे भाजपला जड जाणार नाही. विशेष म्हणजे २०१२ मध्ये उत्तर व मध्य गुजरातच्या ग्रामीण भागात भाजपला काँग्रेसपेक्षा केवळ ०.२ टक्के अधिक मते मिळाली होती. साणंद व वीरमगाममध्ये गेल्या वेळी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. साणंदमध्ये कोली पटेल, वीरमगामध्ये ठाकूर मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे निवडणुकीचा हा टप्पा हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी या युवा  नेत्यांची कसोटी पाहणारा ठरेल. ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी यात टप्प्यातील मतदारसंघातून भविष्य आजमावत आहे. हार्दिक पटेल व हे दोन्ही नेत्यांसाठी काँग्रेसने अनेक इच्छुक उमेदवारांना नाराज केले आहे. पाटीदार, ओबीसी व दलित मतदारांची मोट काँग्रेससाठी बांधून देण्याची हमी देणारे हे नेते मतदारांना स्वत:कडे वळवण्यात यशस्वी ठरतात, त्यावरही काँग्रेसच्या जागा अवलंबून असतील, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.