News Flash

नवी दिल्लीतील जागतिक व्यापार मेळाव्याला ‘मऱ्हाट’मोळा साज

मराठी मनांवर अधिराज्य करणाऱ्या पहाटेच्या भक्तीगीतांपासून ते ठसकेबाज लावणीच्या तालावर ठेका धरायला लावत मुंबईच्या कलारंजन संस्थेच्या कलाकारांनी

| November 15, 2013 02:12 am

मराठी मनांवर अधिराज्य करणाऱ्या पहाटेच्या भक्तीगीतांपासून ते ठसकेबाज लावणीच्या तालावर ठेका धरायला लावत मुंबईच्या कलारंजन संस्थेच्या कलाकारांनी दिल्लीत  गुरुवारपासून सुरु झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात अस्सल मराठी रंग भरून जान आणली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातचा शेजारधर्म वृद्धींगत करणारा तर समोरच्या पव्हेलियनमध्ये पाकिस्तान, जपानला जवळ आणणाऱ्या या ३३ व्या जागतिक व्यापार मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. येत्या २७ नोव्हेंबपर्यंत चालणाऱ्या मेळाव्याचा पहिला दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात आला. मेळाव्याचे हे ३३ वे वर्ष आहे.
देशविदेशातील वस्तूंचे प्रदर्शन, हातमागापासून ते टेरीकॉटचे उच्च प्रतीचे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह खाद्यपदार्थाची रेलचेल व जागतिक अर्थस्थेत मानाचे स्थान असलेल्या या मेळाव्याचा यंदाचा सहयोगी देश जपान आहे. सहयोगी राज्य बिहार असून केंद्रीत (फोकस्ड) राज्य ओडिशा तर केंद्रीत देश दक्षिण अफ्रिका आहे.  
महाराष्ट्राच्या स्टॉलसमोरील दोन भव्य तुताऱ्यांचे प्रवेशद्वार मेळाव्यात आलेल्यांची दाद मिळवून गेले. अर्थात शेजारीच शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, परिवहन, शेती आदी क्षेत्रांच्या विकासवाटांभोवती केंद्रीत असलेल्या केरळ, कर्नाटक व गुजरातच्या प्रवेशद्वारांचीही चर्चा जोरदार सुरु होती. यंदा नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाडय़ातील लहान-मोठे उद्योजक सहभागी झाले आहेत.  
विशेष म्हणजे ‘सूशेगाद’ गोव्याचा स्टॉलदेखील आहे. गोव्याच्या स्टॉलवर नारळाच्या करवंटीपासून बनवलेले दिवे, कुंडल (ईअरिंग्ज), धूप, रजनीदीप (नाईट लँम्प) आदी वस्तू विक्रीसाठी आहेत. काही ‘विशेष’ अतिथींना माशांची चवही चाखायला मिळेल. भारत-पाकिस्तानचे संबंध सीमेवर कसेही असले तरी आर्थिक विकास दोन्ही देशांची नितांत गरज असल्याने पाकिस्तानच्या उद्योजकांनी  व्यापार मेळाव्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.
पाकिस्तानी विशेषत स्त्रियांसाठी असलेला पेहराव, इस्लामी पद्धतीचे सामीष जेवणही पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले. येथे १८ नोव्हेंबपर्यंत केवळ उद्योजकांना प्रवेश आहे. नंतर सामान्य नागरिकांसाठी मेळावा खुला होईल.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:12 am

Web Title: marathi culture takes over 33rd international business summit
Next Stories
1 देशाची सध्याची अवस्था पाहून नेहरू दु:खी झाले असते -मोदी
2 श्रीलंकेला काहीही दडवायचे नाही-राजपक्षे
3 जनमत चाचण्या: कॉंग्रेसकडून बंदीचे समर्थन, मात्र भाजपकडून विरोध
Just Now!
X