‘कोर्ट’ हा चैतन्य ताम्हणे यांचा मराठी चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट परदेशी चित्रपट स्पर्धेच्या पात्रता फेरीत बाद झाला आहे. एकूण ८० चित्रपट स्पर्धेत होते, त्यातील नऊ चित्रपट ऑस्कर स्पर्धेच्या अंतिम फेरीत उरले आहेत. त्यातील सात युरोपियन आहेत. ८८ व्या ऑस्कर स्पर्धेसाठी आता पुढच्या टप्प्यात या चित्रपटांमध्ये चुरस आहे.
ताम्हणे यांचा पहिलाच चित्रपट असलेल्या ‘कोर्ट’ला राजकुमार हिराणी यांचा पी.के., नीरज घायवन यांचा कान पुरस्कार विजेता मसान, उमंगकुमार यांचा मेरी कोम, विशाल भारद्वाज यांचा हैदर, एम मणिकंदन यांचा काका मुटाई व एसएस राजामौळी यांचा बाहुबली या चित्रपटांशी भारतातून निवड होताना सामना करावा लागला होता. उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात भारताकडून कोर्ट चित्रपटाची अधिकृत निवड झाली होती. आता जे चित्रपट या गटाच्या अंतिम फेरीत आहेत त्यात बेल्जियमचा द ब्रँड न्यू टेस्टॅमेंट, कोलंबियाचा एम्ब्रेस ऑफ द सर्पेट, डेन्मार्कचा ए वॉर, फिनलंडचा द फेन्सर, फ्रान्सचा मस्टँग, जर्मनीचा लेबरिंथ ऑफ लाईज, बंगेरीचा सन ऑफ सोल, आर्यलंडचा विवा, जॉर्डनचा थीब यांचा समावेश आहे. यातील नऊ पैकी सात चित्रपट युरोपातील आहेत, तर एक मध्यपूर्वेतील आहे. एक दक्षिण अमेरिकेतील आहे, आशिया व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व मेक्सिको यांना स्थान मिळालेले नाही.
विशेष गाजलेल्या ऑस्ट्रियातील गुडनाईट मॉमी, ब्राझीलचा द सेकंड मदर, इराणचा महंमद- द मेसेंजर ऑफ गॉड, पॅलेस्टाईनचा द वाँटेड १८, पोलंडचा ११ मिनिटस, पोर्तुगालचा अरेबियन नाईट व्हॉल्यूम २, द डेझोलेट वन हे चित्रपट प्रवेश मिळवू शकले नाहीत. ऑस्कर पुरस्काराची नामांकने १४ जानेवारीला जाहीर होणार असून २८ फेब्रुवारीला हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटर येथे पुरस्कार वितरण होईल.