चां. का. प्रभू समाज अहमदाबाद या संस्थेतर्फे पहिल्यांदाच ‘वधू-वर पसंती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रगतीनगर कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला देश-विदेशातील इच्छुकांनी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. प्रथमच आयोजित या मेळाव्यास एकूण १३७ मुला-मुलींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. आश्लेषा देशपांडे व सौ. रचना आंबेगावकर यांनी गणेशस्तुती सादर केली. त्यानंतर अनुष्का दिघे हिने गणेशस्तुतीवर आधारित नृत्य पेश केले. ‘विवाह संस्कार व त्याचे महत्त्व’ याविषयी आश्लेषा देशपांडे यांनी आपले विचार मांडले. समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी स्वागतपर भाषण केले. मेळाव्यासाठी देशातील विविध राज्यांतील समाजाचे प्रतिनिधी, पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. सी.के.पी. समाज अहमदाबाद या संस्थेचे विश्वस्त वसंतराव खोपकर व हेमंत घोसाळकर यांनी सर्व पाहुण्यांचा सत्कार केला. समाजाचे चिटणीस विजय गुप्ते यांनी वधू-वर मेळाव्याचे नियम उपस्थितांना वाचून दाखविले. पूर्वार्धामध्ये नावे पुकारताच मुला-मुलींनी आपापला परिचय करण्यास सुरुवात केली. एका बाजूला पडद्यावर त्यांचे फोटो व माहिती दाखविण्यात येत होती. अनुपस्थित मुला-मुलींचीही माहिती याच पद्धतीने देण्यात आली. त्यानंतर पसंतीदर्शक नंबर्सचे फॉर्म एकत्र करण्यात आले. उत्तरार्धात ५० जोडप्यांनी आपल्या आई-वडिलांच्या उपस्थितीत परस्पर चर्चा केली. एकमेकांशी ओळख करून घेऊन माहितीची देवाणघेवाण केली. ४-५ सेशन्स करून या कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी समाजाच्या ज्या सभासदांनी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वाचे, तसेच सर्व उपस्थितांचे समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुप्ते यांनी मनापासून आभार मानले. अशा रीतीने खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.
चेन्नई महाराष्ट्र मंडळात ‘नूपुर नाद’
(शिल्पा कुलकर्णी)
चेन्नई महाराष्ट्र मंडळाने ‘नूपुरनाद’ हा एक अगदी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. सुप्रसिद्ध नृत्यांगना सौ. स्वाती दैठणकर आणि डॉ. धनंजय दैठणकर आणि साथीदारांनी हा कार्यक्रम सादर केला. सुरुवातीला संत रचनांवर आधारित नृत्य नाटय़ सादर करण्यात आले. त्यानंतर डॉ. दैठणकर यांनी संतूरवादन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नृत्य आणि वाद्य यांची जुगलबंदी सादर करून श्री व सौ. दैठणकर आणि साथीदारांनी आपल्या कलेचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांच्या मनावर ठसवला. अशा प्रकारची नृत्य वाद्य जुगलबंदी प्रथमच सादर करण्यात आली. अतिशय दर्जेदार अशा या कार्यक्रमासाठी चेन्नईच्या रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून कलाकारांना मनापासून भरभरून दाद दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गुजराती अनुवाद प्रकाशित
(मुकुंद घाणेकर)
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर, मूळ मराठी लेखक रा. मो. बेलूरकर लिखित संग्राह्य़ अशा गुजराती अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. सदर गुजराती अनुवाद मधुकर गजाननराव अंबाडे यांनी केला आहे. माने पाटील यांच्या ‘श्रीराम निवास’ या वास्तूत, भक्तगणांच्या उपस्थितीत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, बडोदे या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. उपरोक्त पुस्तकाचे विमोचन येथील संत कबीर मंदिराचे महंत प. पू. दु:खहरणदास महाराज यांच्या शुभहस्ते झाले. या संदर्भात त्यांनी आपले मौलिक विचारही मांडले. त्यानंतर लेखक मधुकर अंबाडे यांनी आपले हृद्गत व्यक्त करीत, सर्वप्रथम हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अंबाडे यांनी गुरुदेव सेवा मंडळाचे हार्दिक आभार मानले. तुकडोजी महाराजांच्या कृपाप्रसादामुळेच मला प्रेरणा मिळाली. हे पवित्र लेखन कार्य गुजराती भाषेच्या माध्यमातून मी गुजराती समाजासाठी करू शकलो अशा विवेकपूर्ण शब्दांत त्यांनी प्रतिपादन केले. श्री तुकडोजी महाराजांची शिकवण आणि एकूण ग्रामोद्धारासाठी त्यांनी केलेले प्रचंड पवित्र कार्य, त्यांची भजने, त्यांचे आदर्श इ. गोष्टी या १२८ पृष्ठांच्या ग्रंथात समाविष्ट आहेत. मधुकर अंबाडे यांनी मराठी पुस्तकाचा गुजराती भाषेत नुसता अनुवाद केला नाही तर स्वत: अंतर्मूख होऊन त्यात त्यांनी भावप्रकटीकरण केल्याची जाणीव सदर पुस्तक वाचत असताना होते. म्हणूनच हा ग्रंथ केवळ अनुवादित नाही तर तो भावानुदीत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
हावडा समाजाच्या वेबसाइटचे उद्घाटन
हावडा महाराष्ट्र समाजाची नवीन कार्यकारिणी निवडली गेली यात सभापती नामदेव नेवले, अध्यक्ष सुधीर बापट, कार्याध्यक्ष- काशिनाथ वाशिनकर, उपाध्यक्ष- शंकरराव सावंत, सचिव उपेंद्र वैदिक, सहसचिव दीपेंद्र जोशी, अशोकराव सावंत, खजिनदार- सुनील विके, सहखजिनदार रंजनराय चौधरी व कार्यकारी सभासद विश्वनाथ वाशिनकर, रोहित बापट, सौ. रेतु सुनील विके याप्रसंगी हावडा महाराष्ट्र समाजाने स्वत:ची जागा आणि भवन उभारण्याचे ठरविले. हावडा महाराष्ट्र समाजाच्या वेबसाइटचे उद्घाटन मा. अजय मुकुंद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. वेबसाइटची संपूर्ण जबाबदारी उपेंद्र वैदिक, विश्वनाथ नाशिककर यांनी घेतली आहे. सुनील विके यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हैदराबादेतील उपक्रम
(विनायक माधव केळकर)
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवडक साहित्य कृतींचा बहारदार कार्यक्रम ‘कुसुमलेली’ हा हैदराबाद शहरातील सुप्रसिद्ध सांस्कृतिक संस्था कलाभिषेक द्वारा सादर झाला. त्यामध्ये निवेदन, गायन व संवाद असा ‘राधे गोविंद’ हा कार्यक्रमही सादर केला. कलाभिषके ही संस्था आपल्या दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध नाटय़संस्था ‘विमल नाटय़ समाज’ काचीगुडा आणि ‘रंगधारा’ नामपल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भ्रष्टाचाराची पदवी’ हे नाटक सादर केले. रसिक प्रेक्षकांनी त्यास उत्स्फूर्त साथ दिली.
बदनावर समाजाची कार्यकारिणी
महाराष्ट्र समाज, बदनावर (धाट) च्या निवडणुका संपन्न झाल्या त्यात व्यंकटेश तारे अध्यक्ष, उपाध्यक्ष मेधा मुजुमदार, सचिव संजय कुळकर्णी, सहसचिव अनिल देव, सदस्य- सौ शोभा देव, सौ. विभा देव, सौ. अभामिका तारे, सौ. अनुपमा नारळे, अरुण तारे हे व्यवस्थापक म्हणून निवडले गेले.
संकलन : रेखा गणेश दिघे