सानंद न्यासच्या यंदाच्या सानंदोत्सवात गुरुदेव गांधी हॉल मैदानावर गुरुदेव शंकर अभ्यंकर याची १८ दिवसांची ‘गीता प्रवचनमाला’ प्रचंड गर्दीत संपन्न झाली. वक्ता दशसहस्त्रेषु उत्तम वक्ते म्हणून अवघ्या मराठी विश्वात सुप्रसिद्ध, विचार-उच्चार आणि आचार यात विलक्षण एकरूपता असलेल्या शंकर अभ्यंकर यांच्या प्रवचनमालेची तयारी सानंद न्यासने अत्यंत यशस्वीपणे केली. वेगवेगळ्या क्षेत्रात वस्तीस राहणाऱ्या भगिनींनी रोज किमान १८ जणांचा समूह करून, प्रवचनापूर्वी त्या अध्यायाच्या सामूहिक पठणाचे नेतृत्व केले. मंचावर श्रीविठ्ठल रखुमाईंची आकर्षक मूर्ती विराजमान होती. सुंदर वृक्षाखाली पारावर व्यासपीठ रचना होती. त्यावरून प्रवचनकार गुरुदेव अभ्यंकर यांनी प्रवचन केले. आकर्षक मंचसज्जा अजय मलमकर यांनी केली होती. १८ दिवस रोज एक अध्याय याप्रमाणे अभ्यंकरांनी अलगदपणे रेशमी तलम कपडय़ाची घडी उलगडावी तसे सोप्या सरळ, सोज्वळ, सर्वसामान्य जनांना समजेल अशा भाषेत गीतेचे सार उलगडून सांगितले.
‘परमेश्वर शाश्वत आहे हा बोध म्हणजेच भक्तीचा प्रारंभ. मन, चित्त, बुद्धी, अहंकार यांना ईशतत्त्वाकडे म्हणजे शाश्वताकडे नित्याकडे वळवणे हाच भक्तीचा गोडवा होय. काम संकल्प, श्रद्धा, धैर्य, लज्जा बुद्धी या सर्वाचे मिळून मन होते. म्हणूनच भगवंतांनी गीतेत ‘मन्मना भव’ असा उपदेश अर्जुनाला केला आहे असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. आजचे जग अर्थामागे धावते आहे. त्यामुळेच ते अप्रामाणिक व विश्वासहीन झाले आहे. निंदा व स्तुतीला बळी न पडता सन्मार्गावरून चालावे असा सल्लाही त्यांनी श्रोतृवर्गाला दिला. ज्ञानाने मोक्ष हे जरी खरे असले तरी केवळ शब्दज्ञान उपयोगी नाही, हे स्पष्ट केले. आपल्या भावपूर्ण प्रवचनात त्यांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या अलौकिक जीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
हजारो श्रोत्यांनी हातात दीपज्योती घेऊन, गीतेची महाआरती केली. अपर्णा अभ्यंकर यांच्या आवाजात इंदूरचे दर्पण भालेराव यांनी गीतेची, श्रीकृष्णाची आरती संगीतबद्ध केली. तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रवचनातून हिंदू धर्म कळण्यासाठी मदत झाली असे तरुणांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचा शुभारंभ उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अभिभाषक जी. एम. चाफेकर यांनी केले. संचालन महाविद्यालयीन विद्यार्थी सानंद मित्रांनी व जयंत भिसे यांनी केले. विनय पिंगळे यांनी आभार मानले.
आनंद भाटे व जयतीर्थ मेवुंडी यांची ‘जुगलबंदी’ नव्हे ‘समन्वय’
सानंद इंदूर न्यासने तरुण गायक आनंद भाटे व श्री जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना तबल्यावर भरत कामत व हार्मोनियमवर सुधीर नायक यांनी साथ केली. ‘समन्वय’ या कार्यक्रमाची सुरुवात धीरगंभीर राग रामकलीने केली. दोन्ही कलाकारांनी आपले स्वराधिपत्य रसिक श्रोत्यांसमोर अत्यंत ताकदीने सादर केले. आनंद भाटे यांची शास्त्रशुद्धता आणि जयतीर्थ मेवुंडीचा कमालीचा खर्ज व खर्जाचा रियाज याचा प्रत्यय श्रोत्यांना आला. प्रेक्षकांच्या इच्छेचा मान राखत अनेक अभंगही एकापाठोपाठ मेडलीच्या स्वरूपात सादर केले. विविध अभंगांच्या प्रस्तुतीने श्रोत्यांना आध्यात्मिक वातावरणात नेऊन सोडले. ‘अगा वैकुंठीच्या राया’ या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली. शास्त्रीय ख्याल असो वा ठुमरी किंवा अभंग दोन्ही गायकांनी दाणेदार ताना, तिन्ही सप्तकात सहजपणे सादर केल्या. वातावरणात रेंगाळत, मंत्रमुग्ध झालेले श्रोते स्वरांच्या लयीत व नादात घरी परतले.
कार्यक्रमाचा शुभारंभ लोकायुक्त मध्यप्रदेश न्या. प्रकाश नावलेकर यांनी दीप प्रज्वलन करून केला. स्वागत सुधाकर काळे, जयंत भिसे, सुभाष देशपांडे, श्रीनिवास कुटुंबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानंद मित्र कु. श्रद्धा कुळकर्णी, तर जयंत यांनी आभार मानले. आकर्षक मंचसज्जा दीपक लवंगडे यांची होती.

अहमदाबादेत राम गडकरी पुण्यतिथी साजरी
(जगदीश बिनीवाले)
कै. राम गणेश गडकरी यांची ९४वी पुण्यतिथी, अहमदाबाद महाराष्ट्र समाज भद्र व सी. के. पी. समाज अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाराष्ट्र समाजाच्या वणीकर सभागृहात साजरी करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष नारायण भोईटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सी. के. पी. समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुप्ते यांनी कै. गडकरी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. सुभाष कुळकर्णी यांनी माधव गडकरी यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून ‘राम गणेश गडकरी यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेत’ त्यांच्या काव्यांचे वाचन केले.

पंकज खर्शीकर यांचे व्याख्यान
(सत्येंद्र माईणकर)
आंध्र प्रदेश चित्तपावन संघ व सावरकर समितीच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित केले होते. हैदराबादेतील सुलतान बाजारस्थित वायएमआयएम वाचनालयाच्या शेषाद्री नाईक सभागृहात बडोद्याचे पंकज खर्शीकर यांनी ‘स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक’  या विषयावर आपले विचार मांडले. स्वा. वि. दा. सावरकर यांच्या ‘जयोस्तुते’ या कवितेच्या प्रस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. घारीपुरीकर यांनी पंकज खर्शीकर यांचा थोडक्यात परिचय करून दिला. वक्त्यांच्या सत्कारानंतर भाषणाचा आरंभ झाला. खर्शीकरांनी १८५७च्या प्रथम स्वातंत्र्यसंग्रामापासून भाषणास सुरुवात केली; तर १९४७ सालांतील घटनांनी शेवट केला. भारतीय इतिहासाच्या महत्त्वपूर्ण घटनेपासून सहभागी असलेल्या प्रमुख क्रांतिकारकांची नावे व कार्याविषयी सविस्तर माहिती कथन करीत असताना मंगल पांडेंच्या नावापासून सुरुवात करून स्वा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आदींच्या नावांपर्यंत त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘भारतीय नाविक दलाच्या बंडामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली यांत शंका नाही’ असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी सुरेश काटे यांनी ‘वंदे मातरम्’ सादर केले.

हैदराबादेत सुगम संगीताचा कार्यक्रम
हैदराबादेतील केशव स्मारक शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात हृषिकेश रानडे व प्राजक्ता रानडे यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. पवित्र ग्रंथ ‘भगवद्गीतेच्या जयंती’निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. वसंतराव व मालिनीताई राजूरकर यांनी कलाकारांना शुभाशीर्वाद दिले. हृषिकेश रानडे, प्राजक्ता, तबलावादक- विक्रम भट, की बोर्डवर परांजपे आणि निवेदक स्वाती वाटवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संगीताची सुरुवात गणेशवंदनेने करण्यात आली. त्यानंतर अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी सादर केली. रसिकांच्या आग्रहावरून काही गाणी पेश केली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
रेखा गणेश दिघे