मुख्यमंत्री योगींची घोषणा, तसेच महाराष्ट्राबरोबर सांस्कृतिक सहकार्य करण्याची घोषणा

महाराष्ट्र दिनापासून प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेश दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्राबरोबरील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सहकार्य करारही करण्याची घोषणाही केली. परप्रांतीयांबाबतच्या वादांच्या पाश्र्वभूमीवर योगींच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या पुढाकाराने लखनौतील राजभवनामध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा नुकताच रंगला. त्यासाठी योगी, त्यांचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, आवर्जून निमंत्रित केलेले सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील आदी उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये योगींनी राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविण्याची घोषणा केली. राज्यपाल या नात्याने नाईक हे उत्तर प्रदेशातील विद्यापीठांचे कुलपती आहेत.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये दीर्घकालीन सांस्कृतिक संबंधांचा उलगडा करताना नाईक यांनी रामायण, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक आदींसंदर्भातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय घटनांचा हवाला दिला होता. तोच धागा पकडून आणि आपल्या भाषणाची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ने करून योगी म्हणाले, ‘आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. शिवरायांनीच आम्हाला भेदभाव न करता ताठ मानेने जगायला शिकविले. राष्ट्रीयत्व त्यांनीच दिले. अशा महाराष्ट्राबरोबरचे सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा माझा प्रयत्न असेल.’

याच कार्यक्रमात नाईक यांनी उत्तर प्रदेशला स्वत:चा विशिष्ट दिवस नसल्याकडे योगींचे लक्ष वेधले होते. ती कल्पना योगींनी लगोलग उचलून धरली आणि दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये २४ जानेवारी हा दिवस ‘उत्तर प्रदेश दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन संयुक्त प्रांताचे नामकरण उत्तर प्रदेश असे केले होते. त्यामुळे २४ जानेवारीची निवड करण्यात आली. योगायोगाने हा दिवससुद्धा नाईक यांनीच सुचविला आहे. १ मेच्या महाराष्ट्रदिनी नाईक व लखनौतील मराठी बांधवांच्या संघटनांतर्फे दोन दिवस सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ‘गीतरामायण’ आणि ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे फडके यांच्या सुश्राव्य गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.