01 June 2020

News Flash

हैदराबादमध्ये म.सा.प.तर्फे ‘संगणकावर मराठी कार्यशाळा’

हैदराबादेतील तेलुगूसह सर्वभाषिक साहित्याचा परिचय श्रोत्यांना व्हावा असा प्रयत्न मराठी साहित्य परिषदेने नेहमीच केला आहे. तेलुगूचे प्रसिद्ध लेखक व समाजसुधारक गुरजाडा आप्पाराव यांच्या १५० व्या

| February 17, 2013 04:02 am

हैदराबादेतील तेलुगूसह सर्वभाषिक साहित्याचा परिचय श्रोत्यांना व्हावा असा प्रयत्न मराठी साहित्य परिषदेने नेहमीच केला आहे. तेलुगूचे प्रसिद्ध लेखक व समाजसुधारक गुरजाडा आप्पाराव यांच्या १५० व्या जयंती वर्षांनिमित्त श्री आप्पाराव यांच्या कार्यशाळांतील १८५० ते १९२० मधील साहित्याचा विचार करण्याचा प्रयत्न द. पं. जोशी यांच्या स्मृतिदिनी परिषदेने केला. ‘आधुनिक भारतीय साहित्याचा उष:काल’ (१८५० ते १९२०) या चर्चासत्रामध्ये तेलुगू, मल्याळी, हिंदी, उर्दू, कन्नडा व मराठी अशा सहा भाषांतील चौदा अभ्यासक सहभागी झाले होते. हैदराबादेतील तीन विद्यापीठांसह भारतातील अनेक विद्यापीठातील वक्त्यांनी सहभागी होऊन या राष्ट्रीय चर्चासत्राची शान वाढविली. ‘माझी मराठी’ या अर्चनाने गायिलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
भारतीय भाषातील स्त्री साहित्याच्या अभ्यासक डॉ. मंदा खांडगे यांनी आपल्या भाषणात दाक्षिणात्य भाषांतील प्रारंभकालीन साहित्यप्रकारांची चर्चा करतानाच बंगाली भाषांतून सुरू झालेल्या वाङ्मय प्रवाहांचा श्रोत्यांना परिचय करून दिला. या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष एन. गोपी यांनी केले. त्यांनी बहुभाषिक साहित्याचे महत्त्व व द. पं. जोशी आणि गुरू जाडा आप्पाराव यांच्या वाङ्मयीन कार्याचे वेगळेपण सांगितले. म.सा.प.च्या अध्यक्षा डॉ. उषाताई जोशी यांच्या उपस्थितीत डॉ. विद्या देवधर यांनी सूत्रसंचालनातून या चर्चासत्राचे वेगळेपण विषद केले. सर्वभाषिक साहित्य संस्था व विद्यापीठातील विविध भाषा विभागांच्या प्रतिनिधींसह जाणकार रसिकांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा उद्घाटन समारंभ साजरा झाला. त्यानंतर ‘प्रारंभकालीन भारतीय काव्य’ या पहिल्या सत्राला प्रारंभ झाला. सभेचे अध्यक्ष डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी प्रारंभकालीन मराठी काव्यातील कल्पनारम्यतेचे विविध पदर उलगडून दाखविले. हिंदी डॉ. शुभदा वांजपे, कन्नड मीरा जोशी, मल्याळी अंबिका नंबियार, उर्दू डॉ. फातिमा यांचे निबंध वाचन अभ्यासपूर्ण तसेच प्रभावी होते. प्रत्येक भाषेतील एकाच कालखंडातील काव्य प्रकटीकरणाची विविधता मनाला प्रसन्न करणारी होती हे साम्यभेद अध्यक्ष डॉ. देशपांडे सूचकपणे लोकांच्या लक्षात आणून देत होते. या सत्राचे संचालन प्रा. मीना देशपांडे यांनी केले.
भोजनोत्तर सत्रामध्ये प्रारंभकालीन भारतीय नाटकाचा विस्तृत पट उलगडला गेला. प्रो. माजिद बेदार यांनी सत्राचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मराठी रंगभूमीच्या प्रेरणेमुळे उर्दू रंगभूमी आकारास आली असे सांगून उर्दू मराठीचे नाते प्रो. माजिद बेदार यांनी स्पष्ट केले. डॉ. अंडम्मा, डॉ. करणसिंह, डॉ. गीता काटे यांनी मराठी नाटय़सृष्टीची प्रारंभकालीन वाटचाल उदाहरणांसह स्पष्ट केली. प्रा. प्रतिभा टेकूरकर यांचे नेटके सूत्रसंचालन होते. ‘प्रारंभकालीन भारतीय कथा’ या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. शैला जोशी यांनी केले. प्रा. नानासाहेब सूर्यवंशी यांनी अध्यक्षपद भूषविले आणि मराठी कथेवरील शोधनिबंध वाचला. दुर्गेश नंदिनी यांनी ‘हिंदी कथा व कादंबरीची वाटचाल’ प्रभावीपणे सांगितली.
हिंदी उर्दूमधील देशभक्तीपर कविता तेलुगू नाटय़सृष्टीचे वेगळेपण, मराठी बंगालीवरील इंग्रजी समीक्षा पद्धतीचा प्रभाव, कन्नडामधील नर्म विनोद व सौंदर्यदृष्टी, मल्याळीमधील उदार स्त्री जीवन या सर्वाचा परिचय करून देणारे प्रेक्षकांची उपस्थिती व वक्त्यांची जोशपूर्ण भाषणे यामुळेच हे चर्चासत्र यशस्वी झाले. चर्चासत्राचा अभ्यासपूर्ण समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गोविंद देशमुख यांनी केले.
मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची जबाबदारी माधव चौसाळकर, अविनाश केसकर व रवि नाईक यांनी सांभाळली. सभाव्यवस्थेकडे भानुदास, उदय व प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी लक्ष दिले.
चर्चासत्राच्या समारोपानंतर पंचधाराच्या ‘द. पं. जोशी स्मृती विशेषांका’चे प्रकाशन उर्दूच्या प्रसिद्ध लेखिका पद्मश्री जिलॉनी बानो यांच्या हस्ते झाले. पंचधारेच्या कामाचे वेगळेपण सांगताना जिलॉनी बानो यांनी प्रा. जोशी यांच्या आठवणी सांगितल्या. ग्रंथपरिचय डॉ. नरहर देव व सूत्रसंचालन डॉ. गीता काटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शोभा शास्त्री यांनी करून दिला. लेखक व पत्रकार राधेश्याम शुक्ला यांनी अध्यक्षस्थान भूषविले. हैदराबादेतील मराठी संस्थेचे हे बहुभाषिक काम त्यांनी वाखाणले. बदलत्या जीवन पद्धतीत भाषा, संवाद आणि लेखन यांचे कार्य व महत्त्व त्यांनी सांगितले. माणसातील माणूसपण जागवण्याचे, माणसांना जोडण्याचे काम भाषांनी व साहित्याने करावयाचे आहे हे शुक्ला यांनी सांगितले. या ग्रंथप्रकाशन समारंभाला हैदराबादेतील सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील मंडळी आवर्जून आली, हे समाधान डॉ. विद्या देवधर यांनी व्यक्त केले. प्रा. द. पं. जोशी यांनी नेहमीच असे आव्हानात्मक कार्यक्रम यशस्वीपणे साजरे केले. त्याच्या माघारीही मराठी साहित्य परिषद सर्व भाषिकांना बरोबर घेऊन समर्थपणे उभी राहील हा विश्वास निर्माण होणे हेच या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे फलित आहे.

द. पं. जोशी स्मृतिदिन साजरा
मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेशचे माजी अध्यक्ष कै. द. पं. जोशी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त परिषदेने विविध वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम आयोजित केले होते. परिषदेतर्फे सायंकालीन मराठी महाविद्यालय चालवले जाते. तेथे नोकरी करणाऱ्या व गरजू मुलांना विनामूल्य शिक्षणाची सोय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मुंबईचे राममोहन खानापूरकर यांनी ‘संगणकावर मराठीचा वापर’ याविषयी एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. संगणकावर मराठीची सद्य:स्थिती सांगून युनिकोडची माहिती दिली. तसेच इंटरनेटवर व दैनंदिन कामकाजात युनिकोडचे प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुशीला व्यापारी यांनी केले. समारोप कार्यवाह डॉ. विद्या देवधर यांनी केला. काही ज्येष्ठ नागरिकांसह एकूण ऐंशी विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

स्वामी विवेकानंद जयंती साजरी
(सत्येंद्र माईणकर)
सुलतान बाजार हैदराबाद स्थित १३३ वर्षे जुन्या वाचनालयात स्वामी विवेकानंदाच्या १५०व्या जयंती निमित्त ‘ध्यान संकल्प दिनाचे’ आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘दृक्श्राव्य’ कॅसेटच्या गाण्याने झाली. ‘देशाने तुम्हाला बरेच काही दिले. तुम्ही देशाला काय देऊ शकता?’ असा या कॅसेटमधील गाण्याचा आशय होते. कन्याकुमारी येथे देवीमातेचे दर्शन घेऊन, पार्वतीमातेने पावन केलेल्या शीळेवर जाण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी घेतली. तीन दिवस व तीन रात्री त्यांनी त्या जागी घालविल्या. या तीन दिवसांत त्यांनी देशाच्या पतनाची कारणे शोधून काढली. या चिंतनातून ही शोचनीय परिस्थिती कशी सुधारता येईल याचा मार्ग दाखविला. देशातील तरुणांना सतत कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या दृक्श्राव्य कार्यक्रमानंतर उपस्थितांनी ध्यान केले व संकल्प केला.
– रेखा गणेश दिघे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2013 4:02 am

Web Title: marathi workshop on computer by m s p in hyderabad
Next Stories
1 पाकिस्तानात भीषण स्फोटात ६३ ठार
2 उपायुक्तांचा मेल हॅक करणाऱ्या पोलिसाला अटक
3 ‘संसदेचे कामकाज बंद पाडणे हा नवा प्रघात’
Just Now!
X