26 May 2020

News Flash

मराठी जगत

दिल्ली येथील सार्वजनिक उत्सव समितीतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त सत्यसाई इंटरनॅशनल सेंटरच्या नाटय़गृहात तीन दिवसांचा मराठी नाटय़महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

| November 25, 2012 05:37 am

सार्वजनिक उत्सव समिती, नवी दिल्लीतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित नाटय़महोत्सवात छोटा शाहीर यश जोशी पोवाडा सादर करताना. सोबत सुप्रसिद्ध कलाकार विघ्नेश जोशी, कल्याणी जोशी, तबलावादक सुहास चितळे दिसत आहेत.

दिल्लीत मराठी रंगभूमी दिन साजरा -(सुरेंद्र कुलकर्णी)
दिल्ली येथील सार्वजनिक उत्सव समितीतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त सत्यसाई इंटरनॅशनल सेंटरच्या नाटय़गृहात तीन दिवसांचा मराठी नाटय़महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
नाटय़महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वंदना गुप्ते आणि राणी वर्मा यांनी ‘ती’ हा कार्यक्रम सादर केला. दोन तासांच्या या कार्यक्रमात मुलीच्या जन्मापासून ते तिच्या आजी होण्यापर्यंतचा प्रवास दृक्श्राव्य माध्यमातून घडवला. नाटय़महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला तो ‘छोटा शाहीर’ यश जोशी याने सादर केलेल्या शिवाजी महाराजांवरील पोवाडय़ामुळे. ‘विरंगुळा’ हा विविधरंगी कार्यक्रम विघ्नेश जोशी यांनी आनंद अभ्यंकर, रमेश वाणी, गौतम मुर्डेश्वर, कल्याणी जोशी, सुहास चितळे या सहकलाकारांसह सादर केला. अद्वैत दादरकर यांनी भक्ती देसाई व अन्य ३० कलाकारांसह ‘संगीत कोणे एकेकाळी’ हा नाटय़प्रयोग सादर करून संगीत रंगभूमीबद्दल आपला आदर व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर व न्या. दिलीप देशमुख यांच्या हस्ते कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समितीचे विश्वस्त रा. मो. हेजीब यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत करून आभारप्रदर्शन केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य स्पर्धा
(पद्माकर पानवलकर)
मराठी वाङ्मय परिषद बडोदे या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्यिकांसाठी कथा, कविता, ललित निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे रु. ५०१/-, रु. ३०१/-, रु. २०१/- अशी रोख बक्षिसे आणि प्रशस्तिपत्रे देण्यात येतात. बडोदे ज्या साहित्यिकांच्या नावाने ओळखले जाते, अशा मान्यवर साहित्यिकांच्या नावे असलेल्या पुरस्कारांनी यशस्वी स्पर्धकांना सन्मानित करण्यात येते. त्याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसेसुद्धा देण्यात येतात. साहित्यिकाने आपली साहित्यकृती  ३१ डिसेंबर २०१२ पूर्वी पुढील पत्त्यावर पोहोचेल अशा प्रकारे पाठविण्याची व्यवस्था करावी. पत्ता- श्री. पद्माकर पानवलकर, श्री दत्तभुवन, १९ गणेशवाडी, खंडेराव मार्केटमागे,  बडोदे-३९०००१, दूरध्वनी क्र. ०२६५ २४११५९९,
भ्रमणध्वनी- ०९९२५६०००२८.

दिल्लीत कोजागिरी साजरी
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दिल्ली येथील मराठा मित्र मंडळाच्या पुढाकाराने, बँक ऑफ महाराष्ट्र, लॅब इंडिया, हेल्थ केअर, सार्वजनिक उत्सव समिती, दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आणि महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज यांच्या संयुक्त सहकार्याने सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम चौगुले पब्लिक स्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. व्ही. एस. सिरपूरकर आणि न्यायाधीश दिलीप देशमुख मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुमारे दोन तास रंगलेल्या या मैफिलीची सुरुवात आनंद भाटे यांनी पूरिया धनश्री रागातील चीजेने केली. त्यानंतर, नाटय़संगीत, भक्तीसंगीत, भावगीते, भजने इ. पेश करीत ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीने मैफिलीची सांगता केली. त्यांना तबल्यावर विनोद लेले व संवादिनीवर अमित मिश्रा यांनी साथ केली. मराठा मित्र मंडळाचे कर्नल मोहन काकतीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मंडळाचे प्रमुख कार्यवाह विलास जोशी यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

भावपूर्ण श्रद्धांजली
(प्रवीण प्रधान)
बडोदे येथील नलिनी आंबेगांवकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ऑक्टोबर १९४५ ते १९८१ या काळात भारतीय रिझव्‍‌र्ह बँक, मुंबई येथे त्यांनी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. मॉनेटरी क्रेडिट, बँकिंग पॉलिसीज, इंटरनॅशनल ट्रेड, पब्लिक फायनान्स या विषयांत त्यांचे विशेष नैपुण्य होते. आर. बी. आय. प्रतिनिधी म्हणून ऑल इंडिया ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्री, कॉटन अ‍ॅडव्हायझरी बोर्ड, ज्युट कमिशनर कोलकाता, स्पायसिस कोचीन, टी-बोर्ड प्लॅन्टेशन कोलकाता, गोहत्ती, युको बँक, ट्रेड व अ‍ॅग्रिकल्चर पॉलिसी सल्लागार असे कार्य केले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, वॉशिंग्टनतर्फे बँक ऑफ मॉरिशस व बँक ऑफ जपान, टोकियो सल्लागार तसेच भारतीय कमिटी सदस्या म्हणून अनेक वैशिष्टय़पूर्ण सेवा दिल्या. सामाजिक कार्याची आवडही त्यांनी विविध संस्थांमध्ये काम करून जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जोपासली. रामकृष्ण मिशन, खार मुंबई येथे त्यांनी ९ वर्षे कार्य केले. शेवटच्या श्वासापर्यंत बडोद्यातील महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालय येथे मानद खजिनदार म्हणून कार्य केले. बडोद्यातील बहुसंख्य मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बडोदा नरेशांच्या पत्नी राधिकाराजे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बडोद्याच्या हौशी कला मंडळाचा       वर्धापन दिन साजरा
(मुकुंद घाणेकर)
हौशी कला मंडळ बडोदे या संस्थेने आपला ४१ वा वर्धापन दिन साजरा केला. पं. नारायण गुरू तालीम पटांगणात हा सोहळा संपन्न झाला. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर दाते यांनी सर्व कलाकारांचे व श्रोतृवर्गाचे स्वागत केले. सोहळ्याचे अतिथी विशेष प्रा. भालचंद्र जोशी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीपूजन झाले. घनश्याम बहुधान्ये यांनी मंडळाविषयी थोडक्यात आवश्यक माहिती दिली. श्री. मुकुंद घाणेकर यांनी भालचंद्र जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मंचावरील कलाकारांचेही संस्थेच्या सदस्यांनी यथोचित स्वागत केले. मुंबईच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. शाल्मली जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित केला होता. गाण्याला दमदार सुरुवात करून त्यांनी बंदिशी, मिश्र ठुमरीही पेश केल्या. त्यानंतर नाटय़संगीत, भक्तिगीते सादर करीत भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना संवादिनीवर देवेंद्र कोठारी, ऑर्गनवर सुभाष ताटके, तबल्यावर नंदकिशोर दाते, पखवाजवर नितीन भट, सुरतकर (झांज) तानपुऱ्यावर पौलोमी देशमुख आणि आरती रहाळकर यांनी साथ केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2012 5:37 am

Web Title: marathi world
Next Stories
1 मद्यसम्राट चढ्ढा गोळीबारप्रकरणी नामधारीच मुख्य सूत्रधार
2 आंतरराष्ट्रीय तबलिगी इज्तिमास भोपाळमध्ये सुरुवात
3 मेंदूतील आखूड डीएनएमुळे होतात स्मृतिभ्रंश व स्वमग्नतेसारखे विकार
Just Now!
X