13 December 2017

News Flash

मराठी जगत

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच्या वतीने ‘मोडी लिपी आणि तिची गरज व सद्यस्थिती’ याची जाणीव

रेखा गणेश दिघे | Updated: November 11, 2012 2:22 AM

डॉ. गणेश मतकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेली इंदूरकर मंडळी.

इंदूरमध्ये मोडी लिपी प्रशिक्षण
(मनोहर धडफळे)
महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच्या वतीने ‘मोडी लिपी आणि तिची गरज व सद्यस्थिती’ याची जाणीव करून देण्यासाठी मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या वतीने श्रीयुत कृष्णाजी म्हात्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
संपूर्ण भारतात स्वातंत्र्यापूर्वी १०० वर्षे मराठय़ांचेच साम्राज्य होते. त्यांच्या राज्यात पूर्वापार चालत आलेल्या मोडी लिपीतच सर्व कारभार चालत होता. त्यातील बरेचसे दस्तऐवज, करारनामे, आज्ञापत्रे, भू-अभिलेख इ. मोडी लिपीतच आहेत. इ. सन १९५० नंतर मोडी लिपी मोडीतच निघाल्याने ती सर्व कागदपत्रे तशीच पडून आहेत. मोडी लिपीचे जाणकार फारच मोजके असल्याने ती कागदपत्रे अद्यापि वाचली गेली नाहीत. ती वाचली जावीत अन् मराठय़ांच्या देदीप्यमान कारकीर्दीचे आकलन आजच्या पिढीस व्हावे ही काळाची गरज आहे, असे म्हात्रे यांनी निक्षून सांगितले. याप्रसंगी पुरातन विभाग भोपाळचे अधिकारी सय्यद नईमुद्दीन हेही उपस्थित होते. वस्तुस्थितीची जाणीव करून देताना ते म्हणाले की, बऱ्याचशा न्यायालयीन प्रकरणांत प्रमाण म्हणून मोडी लिपीत असलेले दस्तऐवज प्रस्तुत करण्यात येतात. देवनागरीत लिप्यंतर करून घेण्यासाठी मुंबईस पाठवावे लागतात. यात बराच कालावधी जातो. मध्य प्रदेशातल्या प्रमुख शहरांत मोडी लिपीचे प्रशिक्षण द्यायची व्यवस्था झाल्यास सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. नईमुद्दीन यांचे हे मत प्रमाण मानून महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरने अलीकडेच १० दिवस रोज दोन तास मोडी लिपी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. कृष्णाजी म्हात्रे यांनी सहज आकलन होईल अशा रीतीने विस्तारपूर्वक माहिती पुरवून हे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचे साहाय्यक राघव माळी यांनी इतर माहिती पुरविली. या प्रशिक्षण वर्गाचा वय वर्षे ३० ते ८५ या वयोगटातल्या एकूण ३० मंडळींनी लाभ घेतला.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन येथील पार्षद अर्चना चितळे यांनी केले. शासकीय दृष्टिकोनातून हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे त्यांनी सांगितले. समापनाच्या दिवशी खनिज निगमचे उपाध्यक्ष गोविंदजी मालू आणि नजूल तहसीलदार पूर्णिमाजी सिंधी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना या आयोजनाबद्दल महाराष्ट्र साहित्य सभेचे कौतुक केले. स्थानीय प्रशासनाकडून या उपक्रमास हवा तो सहयोग देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

अहमदाबादेत कोजागरी साजरी
(जगदीश बिनीवाले)
प्रतिवर्षांप्रमाणे यंदाच्या वर्षीही अहमदाबादमधील विविध विभागांतील मराठी मंडळांनी कोजागरी उत्सव उत्साहात साजरा केला.मणिनगर येथील महाराष्ट्र मंडळ, कांकरिया व चितपावन ब्राह्मण संघ या संस्थांनी संयुक्तपणे कोजागरी साजरी केली. दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजेने उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘सॅलेड डेकोरेशन’ आणि ‘पाककला स्पर्धा’ घेण्यात आल्या. मिलिंद तट्टू यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित केला होता.
आंबावाडी महाराष्ट्र मित्रमंडळ या संस्थेने अमोल निसळ यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता.महाराष्ट्र समाज भद्र यांच्या वणीकर सभागृहात अभिनेत्री गात यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाने कोजागरी उत्सवाची रंगत वाढविली.सी.के.पी. समाजाने संपन्न कॉम्प्लेक्समधील समाजाच्या जागेत विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करून कोजागरी साजरी केली. इतर भागांतही उत्साही वातावरणात कोजागरी साजरी केली.

‘अंतरीचे बोल’ प्रकाशित
इंदूरच्या ८५ वर्षीय सुशीलाबाई होळकर यांच्या ‘अंतरीचे बोल’ कवितासंग्रहाचे विमोचन येथील गणेश दत्त मंदिर वासुदेवनगरच्या सभागृहात झाले.
विमोचन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पूर्वडेप्युटी कलेक्टर  सी. एम. बारगळ होते. मालिनी पोटे यांनी श्रीमती होळकर यांचा संक्षिप्त परिचय करून दिला.

स्थानिक साहित्य स्पर्धा २०१२
मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही स्थानिक साहित्यिकांसाठी विविध मराठी साहित्य स्पर्धाचे आयोजन केले आहे. ‘संस्काराचे बदलते परिमाण’ या धार्मिक विषयावरील निबंध व ‘२०५० साली जीवन कसे असेल’ असा वैज्ञानिक निबंध विषय आहे. साहित्य स्वीकारण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१२ असून सविस्तर माहितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा : पद्माकर पानवलकर, स्पर्धा संयोजक, अखिल भारतीय मराठी साहित्य स्पर्धा, श्री दत्तभुवन, १९ गणेशवाडी, खंडेराव मार्केटमागे, बडोदे-३९०००१. दूरध्वनी- ०२६५-२४११५९९, भ्रमणध्वनी- ९९२५६०००२८.

बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचे ६५वे वार्षिक अधिवेशन
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचे ६५ वे वार्षिक अधिवेशन बेळगाव (कर्नाटक) येथे दि. ११, १२ व १३ जानेवारी २०१३ रोजी आयोजित केले आहे. अधिवेशन आयोजनकर्ता ‘मराठी भाषाप्रेमी मंडळ, बेळगाव’ हे आहेत. अधिवेशनाचे संयोजक प्रदीप नारायण कुळकर्णी असून त्यांचा मोबाइल ०९४४८६३५६९३ व दूरध्वनी ०८३१-२४६४२८० असा आहे.

‘होळकर राजवटीचा चालताबोलता इतिहास मौन झाला’
(सुभाष वाघमारे)
‘लोकसत्ता’साठी गेली कित्येक वर्षे सातत्याने इंदूरच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींच्या बातम्या देणारे नाटय़तपस्वी डॉ. गणेश शंकर मतकर यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. श्री क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या वतीने आयोजित शोकसभेत इंदूरच्या अनेक सामाजिक व नाटय़संस्थांच्या प्रतिनिधींनी डॉ. मतकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. इंदूरच्या ‘मी मराठी’ साप्ताहिकाचे संपादक सुभाष रानडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच महापौर कृष्णमुरारी मोघेही विशेष पाहुणे म्हणून हजर होते. डॉ. मतकर यांनी ‘इ. स. १७२८ ते १९४८ या कालखंडातील होळकर राजवटीतील सांस्कृतिक व साहित्यिक कार्याचा चिकित्सक अभ्यास’ हा १२०० पानांचा ग्रंथ मतकर यांनी पीएच.डी.साठी केला.
५६ वर्षे रंगकर्म, ५२ वर्षे देवी अहिल्या जन्मोत्सव, ४० वर्षे बालनाटय़ शिबिर, देवी अहिल्या होळकर चित्र प्रदर्शनी, अहिल्या मिनी थिएटर, साहित्यरचना, उत्तर ते दक्षिण भारतात असंख्य व्याख्याने, एकपात्री नाटय़प्रयोग अशी अनेक कार्ये त्यांच्या कार्यव्याप्तीची ओळख होण्यास पुरेशी आहेत. कोणतीही माहिती पुरविणारे सदैव तत्पर ‘एनसायक्लोपीडिया’ म्हणूनच इंदूरकरांची त्यांच्या जाण्यावर व्यक्त झालेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया ‘होळकर राजवटीचा चालताबोलता इतिहास मौन झाला’ त्यांच्या थोरपणाची ग्वाही देते.

First Published on November 11, 2012 2:22 am

Web Title: marathi world 2