09 March 2021

News Flash

मराठी जगत : सानंद न्यास इंदूरमध्ये साक्षात आशा भोसलेरेखा

(जयंत भिसे) पद्मविभूषण आशा भोसले आणि सुधीर गाडगीळ यांच्या मुक्त गप्पांचा कार्यक्रम ‘सानंद’ इंदूर या संस्थेने आयोजित केला होता. हा दिवस सानंद रसिकांसाठी खास दिवस होता.

| April 14, 2013 02:19 am

(जयंत भिसे)
पद्मविभूषण आशा भोसले आणि सुधीर गाडगीळ यांच्या मुक्त गप्पांचा कार्यक्रम ‘सानंद’ इंदूर या संस्थेने आयोजित केला होता. हा दिवस सानंद रसिकांसाठी खास दिवस होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित मराठी रसिक उत्सुकतेने आशाताईंची वाट बघत होते.  आशा भोसले यांना प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आणि आनंद प्रत्येकाच्या नजरेत दिसत होता. आशा भोसले यांच्याबरोबर शाब्दिक जुगलबंदी करण्यासाठी सुधीर गाडगीळही हजर होते. अशा आनंदी व भारावलेल्या वातावरणात अभय प्रशालेमध्ये बसलेल्या सानंदकर श्रोत्यांच्या उपस्थितीत अनौपचारिक गप्पांना सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच आशाताई आपल्या बालपणीच्या आठवणीत रमल्या. इंदूरच्या मावशीकडचे वास्तव्य त्यांना आठवत होते. इंदूरच्या लोकांचे अगत्य, खाण्याची व खिलवण्याची हौस ह्य़ांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. गायनाच्या क्षेत्रात ज्यावेळी आशाताईंनी पाऊल ठेवले, त्या वेळची आठवण करताना त्या म्हणाल्या की, त्यावेळी लतादीदी संपूर्ण तेजानिशी तळपत होत्या. त्यांच्याबरोबरीने पंजाबची दमदार आवाजाची शमशाद, बंगाली गोडवा असलेली गीता रॉय आणि आपल्या वैशिष्टय़पूर्ण आवाजाने ओळखली जाणारी अमीरबाई कर्नाटकी यादेखील प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. या सगळ्यांच्या उपस्थितीत आपली ओळख स्थापित करणे कठीणच होते. आशाताईंनी मग पाश्चिमात्य संगीताची मदत घेतली. इंग्लिश चित्रपट बघितले. त्याकरिता माईंकडून रागावूनदेखील घेतले आणि हळूहळू स्वत: करिता एक जागा मिळविली. १९४३ मध्ये आशाताईंनी ‘माझं बाळ’ या चित्रपटाकरिता पहिले मराठी गीत गायिले. त्या काळाची आठवण करताना त्या बऱ्याचशा भावूक झाल्या. त्यांना आठवत होता बोरिवली ते चर्चगेट प्रवास. जिथून पुढे त्या जे. जे. स्टुडिओला जात असत. क्लासची ५ रुपये फी देण्याकरिता केलेला आटापिटा त्यांना आठवत होता. त्यावेळच्या संगीत दिग्दर्शकांचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. संगीताच्या शिक्षणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, प्रारंभीचे धडे आपण वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांजकडे घेतले. नंतर लतादीदीकडे शिकावयास सुरुवात केली. गाण्याची पहिली परीक्षा देत असताना, परीक्षक शंकरराव व्यास यांनी आपणास मध्येच थांबवून तू अतिशय सुंदर गातेस. माझ्या चित्रपटाकरिता गायला ये असे आपणास सांगितले आणि त्यांच्या ‘रामराज्य’ या चित्रपटाकरिता त्यांच्या आवाजात गीत ध्वनिमुद्रित झाले असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आपण गाऊ शकणार नाही अशी विनंती व सूचना आशाताईंनी गाडगीळ यांना केली होती. तरीही गाडगीळ यांनी मोठय़ा कौशल्याने विविध संगीतकारांच्या संगीताबद्दल अनेक प्रश्न विचारून आशाताईंना काही गाण्यांचे मुखडे गाण्यास भाग पाडले. संगीत दिग्दर्शकांचा उल्लेख करताना त्यांनी, राहुलदेव बर्मन, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांचा व त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण पद्धतीचा उल्लेख केला. चित्रपटाकरिता गात असताना अभिनेत्रीचा विचार हा करावाच लागतो व त्या अनुषंगाने गाण्यात अभिनयदेखील येतो असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या रसिक श्रोत्यांबद्दलदेखील त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कधी खळखळून हसत तर कधी डोळ्यांतील अश्रू पुसत त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. गायनाबरोबरच स्वयंपाकाची आपली आवडही त्यांनी सांगितली. भारताबाहेर आपली स्वत:ची १० रेस्टॉरंटस् असून तिथे ‘कुकिंग शो’ आयोजित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गेली जवळजवळ ७० वर्षे आशाताई गात आहेत. १३ भाषांतून ११ हजाराहून अधिक गीते गाण्याचा उच्चांक त्यांनी गाठला आहे. श्रोत्यांना आनंदात ठेवणे हाच त्यांचा उद्देश आहे. सानंद न्यास इंदूरला उत्तम काम करीत आहे. मध्यप्रदेशात इतक्या संख्येने मराठी भाषी आहेत याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी गाण्यातल्या चुका रियाजाने सुधारल्या. हा सोहळा, ही मैफल कधी संपूच नये असे वाटत असताना, संपला आणि त्या अपूर्णतेच्या गोडीने सानंद इंदूरकर श्रोत्यांना वेड लावले.
कार्यक्रमाचा शुभारंभ म. प्र. उच्च न्यायालयाचे न्या. शंतनु केमकर व मोहिनी केमकर यांनी दीप प्रज्वलन करून केला. स्वागत अध्यक्ष सुधाकर काळे व मानद सचिव जयंत भिसे यांनी केले. स्मृतिचिन्ह सुभाष देशपांडे व श्रीनिवास कुटुंबळे यांनी भेट दिले. स्मिता  देशमुख व डॉ. माया इंगळे यांनी आशा भोसले यांना इंदूरची खास महेश्वरी साडी भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन कु. देवयानी सुपेकर हिने, तर आभार जयंत भिसे यांनी व्यक्त केले. नेत्रदीपक आकर्षक रंगीबेरंगी फुलांचे नेपथ्य दीपक लवगडे यांचे होते. आशा भोसले व सुधीर गाडगीळ यांनी सानंद इंदूरच्या रसिकांचे भरभरून कौतुक केले.

महिला विशेष कार्यक्रम
(माधवी प्रवीण प्रधान)
सी. के.पी. सीनियर सिटिझन्स मंडळ बडोदे मंडळाच्या ‘महिला विशेष कार्यक्रम’ वैशिष्टय़पूर्ण सादर करण्याच्या प्रथेनुसार गीता खुळे यांचा खिडकी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सत्यभामाबाई आंबेगावकर सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. सुख दु:ख, करमणूक या संवेदना ‘खिडकी’च्या माध्यमातून उपस्थितांना अनुभवावयास मिळाल्या. कळवळून रडणारे मूल, मुद्दामच उलटसुलट पदार्थाची कृती सांगणाऱ्या शेजारच्या काकू, सासरी गेलेल्या मुलीविषयी आईला वाटणारी काळजी इ. गमतीजमती खिडकीतून पाहावयास मिळाल्या. या सर्व मूर्त खिडक्या अभियनाद्वारे, तर अमूर्त खिडक्यातून मनातील विचार गीताताईंनी प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या साहाय्यक पुनम गुप्ते यांच्या सहकार्याने कार्यक्रम अधिक उठावदार झाला.
मंडळाच्या सभासदांच्या मुलांना, त्यांच्या व्यवसायांना कौतुकाची थाप देण्याच्या प्रथेनुसार विनीता व राहुल रोडे-न्यूझिलंड, चारुचंद्र व पुष्पाजली कोर्डे-न्यू दिल्ली यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दोघांनीही स्वच्छेने मंडळास देणग्या देऊन उपकृत केले.
या कार्यक्रमासाठी सर्वश्री हेमंत फणसे, प्रकाश कामेकर, सुजित प्रधान यांनी देणगी देऊन मंडळाला प्रोत्साहित केले.

बडोद्यात दासनवमी साजरी
(मुकुंद घाणेकर)
श्रीसमर्थ सेवा संघ आणि ब्राह्मण सभा बडोदे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा झाला. नारायणगुरू तालीम प्रांगणात हा उत्सव संपन्न झाला. उत्सवाच्या तिन्ही दिवशी दीपक शंकर रास्ते, पुणे यांची सुश्राव्य कीर्तने ऐकण्याची संधी श्रोतृवर्गाला मिळाली. पहिल्या दिवशी रामदास स्वामी आणि दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या अभंगावर बुवांनी सविस्तर निरूपण केले. ऑर्गनवर त्यांना सुभाष ताटके तर तबल्यावर संतोष करंजगावकर यांनी उत्तम साथ केली. कृपेश वैशंपायन यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2013 2:19 am

Web Title: marathi world 5
टॅग : Marathi,News
Next Stories
1 मोदी हे तर ‘स्टार’ राजकारणी : चीनच्या उच्चायुक्तांकडून कौतुक
2 कोळसा खाण वाटपाचा सीबीआय अहवाल बदलल्याचा एसआयटीकडून तपास करा – भाजपची मागणी
3 खलिस्तानी दहशतवादी भुल्लरची फाशी कायम
Just Now!
X