28 May 2020

News Flash

मराठी जगत

बेंगळुरू महाराष्ट्र मंडळाच्या संस्थापक दिनाची सुरुवात मोठी जोशपूर्ण झाली. प्रथेप्रमाणे मंडळाचे संस्थापक कै. बापूराव जोशी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध

| June 9, 2013 03:43 am

(अनुराधा चौगुले)
बेंगळुरू महाराष्ट्र मंडळाच्या संस्थापक दिनाची सुरुवात मोठी जोशपूर्ण झाली. प्रथेप्रमाणे मंडळाचे संस्थापक कै. बापूराव जोशी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक सुबोध जावडेकर, ‘अभिमान योगदान पुरस्कारांचे’ यंदाचे मानकरी डॉ. रोहिणी गोडबोले आणि शशिकांत दिवाकर यांचे स्वागत झाले.
महाराष्ट्र निवास बिल्डिंग ट्रस्टमधून यंदाच्या वर्षी निवृत्त होणारे विश्वस्त मा. सुधीर तांबे आणि शशी दिवाकर यांची वैशिष्टय़े सांगत त्यांच्या कार्याचा सुयोग्य परिचय अभय दीक्षित यांनी करून दिला. महाराष्ट्र मंडळ व महाराष्ट्र निवास बिल्डिंग ट्रस्ट या संस्थांच्या कारभाराचा पसारा व डोलारा सांभाळण्यासाठी अशी कर्तबगार माणसं सामाजिक जाणिवेतून आपणहून पुढे होतात म्हणूनच या संस्था प्रगती करीत आहेत, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले. अभिमान योगदान सन्मानप्राप्त व्यक्तींची ओळख ऐकताना नेहमीच अचंबित व्हायला होते हेही त्यांनी मान्य केले. कोणत्याही कामाला तनमनाने आणि बुद्धीने वाहून घेतलेला माणूस सहजी दिग्गज होतो हे अधिक पटलेले पुन्हा दृढ होते. सन्मानाला उत्तर देताना रोहिणीबाईंनी ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ हा विषय इतका सोपा करून समजाविला, की त्यावरूनच त्यांची त्या विषयातली तज्ज्ञता समजली. त्यांच्या निगर्वी ज्ञानापुढे नतमस्तक व्हावंसं वाटलं. शशी दिवाकरांचा सन्मान होताना पाहून त्यांच्याबरोबर काम केलेल्या सहकारी मित्रांनाही त्यांच्या एवढंच गहिवरून आलं असेल. दिवाकरांना सामाजिक कामाकडे खेचून आणणाऱ्या त्यांच्या प्रेरक व्यक्ती आणि सहकारी मित्रांच्या आठवणी त्यांनी या वेळी सांगितल्या. त्यातूनच त्यांच्यातला सच्चा माणूस व्यक्त झाला असावा असं वाटलं.
‘मलाच माझा फसवीत मेंदू’ अशा आपल्याला गुगली टाकणाऱ्या नावाच्या व्याख्यानातून सुबोध जावडेकरांनी सुबोध भाषेत बोलताना, स्लाइडस् दाखवीत, मेंदूसारख्या गहन कोडय़ाचा एक पैलू सोपा करून सांगितला. त्यांच्यासारख्या विज्ञान साहित्यकाराचे अमोल विचार ऐकण्याकरिता बेंगळुरूकर मोठय़ा संख्येत उत्सुकतेने आले होते.
एक उत्कंठावर्धक माहितीपूर्ण व्याख्यान, अभिमान योगदान पुरस्कार प्रदानाचा हृद्य सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचे पुरस्कारांच्या रूपाने केलेले कौतुक, एकूण समारंभाचे नेटके आयोजन केल्यामुळे हा ‘संस्थापक दिन’ उचितरित्या पार पडला.

संकेतस्थळ लोकार्पण कार्यक्रम
(सत्येंद्र माईणकर)
मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आ. नील गोगटे संचालक केशव मेमोरिअल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अर्चना आचलरेकर यांच्या सरस्वती स्तवनाने झाली. संगणकीकरण समितीचे संयोजक व म. ग्रं. सं. कार्यकारिणी सदस्य दिलीप रातोळीकर यांनी संकेतस्थळ निर्माण करण्यामागची भूमिका, त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, केशव इन्स्टिटय़ूटच्या प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थीवर्ग यांचे योगदान यावर विस्तृत प्रकाश टाकला. माधवी नेने यांनी म. ग्रं. सं.ने गेल्या १५ वर्षांपासून नेटाने केलेल्या डेटा एण्ट्रीचा उपयोग संकेतस्थळाचे काम लवकर होण्यास कारणीभूत झाल्याचे सांगितले. दिलीप रातोळीकर यांनी संस्थेचे अध्यक्ष दिगंबरराव खळदकर यांच्या याकामी लाभलेल्या सक्रिय पाठिंब्याचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. या संकेतस्थळाच्या कामी गेल्या चार महिन्यांपासून अथक प्रयास करणारे या टीमचे प्रमुख उमेश गोगटे यांनी www.marathiaranthalay.com  या संकेतस्थळाची संपूर्ण माहिती सादर केली. वेबसाइटच्या मदतीने ग्रंथालयाची ओळख, इतिहास, संकेतस्थळात प्रवेश, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, ग्रंथाचा शोध, ग्रंथाचे आरक्षण, कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार, घटना यांची इत्थंभूत माहिती मराठीमध्ये उपस्थितांना दिली. तद्नंतर संकेतस्थळ निर्मितीत सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे नील गोगटे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला, तसेच उमेश गोगटे आणि संगणकीकरण संयोजक दिलीप रातोळीकर यांनाही गोगटे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली. संगणकीकरणाची सुरुवात १५ वर्षांपूर्वी ज्यांनी केली ते संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्माकर दादेगावकर यांचाही सत्कार त्यांच्या घरी जाऊन केला जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिगंबरराव खळदकर यांनी नील गोगटे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. डॉ. कांचन जतकर यांनी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये देऊन त्यांचे कौतुक केले. सतीश देशपांडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बडोद्यात राजन भिसे यांची प्रकट मुलाखत
सी. के. पी. सीनिअर सिटिझन्स मंडळ बडोदे, वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. अलीकडेच मंडळाच्या वतीने अंजली मराठे यांनी राजन भिसे यांची प्रकट मुलाखत घेतली. मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट लोकप्रिय अभिनेते त्यांच्या अभिनयाची उंची सर्वानाच माहिती आहे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला. मुळात एक उत्तम आर्किटेक्ट असूनही अभिनयाच्या क्षेत्राकडे कसे आपण वळलो याचा अत्यंत मार्मिकपणे खुलासा त्यांनी केला. लहानपणापासून बालरंगभूमी, प्रायोगिक व समांतर रंगभूमीवर काम आपण केले; परंतु व्यावसायिक रंगभूमीशी आपला विशेष संबंध आला नव्हता. मी व्यवसायासाठी परदेशात गेलो; परंतु अभिनयाशी नाते मात्र कायम ठेवले. पुन्हा भारतात आल्यावर सल्लागार म्हणून नोसील कंपनीत काम मिळाले; परंतु दुर्दैवाने कंपनी बंद पडली. मधून मधून लहानमोठी कामे केली तरीही मानसिक समाधान मिळत नव्हते. एके दिवशी केदार शिंदे यांनी मला फोन करून टी. व्ही. मालिकेत काम करशील का? असे विचारले. दिलीप प्रभावळकर यांच्या ‘टिपरे’ या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारावयास सुरुवात केली आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. मी स्वत: नेपथ्यकार असल्याचा सेटवर नेहमीच उपयोग झाला असल्याचेही भिसे यांनी सांगितले. दामू केंकरे यांच्याबरोबर काम करताना आपण खूप काही शिकलो. स्वत:ची कामे स्वत: करावयाची. पडेल ते काम करावयाचे विशेष म्हणजे त्यांच्यामुळेच अत्यंत शिस्त आम्हाला लागली असे सज्जन यांनी अत्यंत आदराने आवर्जून सांगितले. मालिकांमध्ये काम करण्यास आपण तितकेसे उत्सुक नसून, आपल्याला दिलेले काम चोख करण्याकडे आपण लक्ष देतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. भूमिका वठवताना त्याविषयीचे भान ठेवावयास लागते, असेही त्यांनी काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले तर आपण एका वेळी एकच मालिका करतो व ती पूर्ण झाल्यावर दुसरीकडे वळतो, असेही ते म्हणाले. टिपरे मालिकेतील शलाकाची भूमिका करणाऱ्या मुलीने स्वत:चे लग्न ठरविले होते. त्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्या वेळी कोर्टात तिच्या बाजूने तिचे वडील म्हणून मी स्वाक्षरी केली त्या वेळी क्षणात काळजात चर्र्र झालं. जाणवलं की, आपली मुलगी आता आपली राहिली नाही एका कलावंताच्या चेहऱ्यामागे एक भावनाप्रधान मनही असते ते कधी कधी अचानक उलगडत जाते, याचं प्रत्यंतर त्या वेळी मला आले. ही गोष्ट त्यांनी अत्यंत भावुकपणे आपल्या मुलाखतीतून व्यक्त केली. याशिवाय प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
एकत्र कुटुंब पद्धतीविषयी स्वत:ची मते मांडताना त्यांनी सी. के. पी. समाज अजूनही एकत्र कुटुंब पद्धती मानतो आणि कुटुंबाला धरून राहतो म्हणून स्वत:चं आयुष्य आनंदाने जगत असतो याचा, आपणांस खरोखरीच अभिमान वाटतो, असे मुलाखतीच्या शेवटी त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2013 3:43 am

Web Title: marathi world 6
Next Stories
1 लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिकसंबंध ठेवणे बलात्कारच- उच्च न्यायालय
2 ‘आजारी’ अडवाणींची पदाधिकारी बैठकीला दांडी
3 इंटरनेटवरून सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेणाऱ्या लोकांचा तपशील मागविल्याची अमेरिकेची कबुली
Just Now!
X