‘पोलादी स्त्री’ म्हणून ओळख असलेल्या मार्गारेट थॅचर मुक्त बाजारपेठेच्या कट्टर पुरस्कर्त्यां होत्या.  श्रीमती थॅचर या त्यांच्या रोखठोक व्यवहार आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होत्या. टोकाची टीका आणि मतदारांचा भरभरून मिळालेला पाठिंबा या दोन्हीचा अनुभव त्यांनी त्यांच्या वादळी कारकिर्दीत घेतला. ब्रिटनचे राजकारण १९७९ ते १९९० या अकरा वर्षांमध्ये त्यांच्याभोवती फिरत होते. या काळात त्या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. इतका प्रदीर्घ काळ ब्रिटनचे सर्वोच्च राजकीय पद भूषविणाऱ्या त्या विसाव्या शतकातील अद्वितीय राजकीय नेत्या होत्या. ब्रिटनच्या त्या आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत.
हुजूर पक्षाच्या खासदार म्हणून त्या उत्तर लंडनमधील फिंचले येथून १९५९ मध्ये प्रथम निवडून आल्या. सुमारे तीन दशकांची त्यांची संसदीय कारकीर्द १९९२ मध्ये त्या हाउस ऑफ कॉमन्समधून निवृत्त झाल्याने संपुष्टात आली. त्यांचे मूळ नाव मार्गारेट रॉबर्ट्स. शिक्षणमंत्री असताना त्यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेची चुणूक दाखविली. त्यांनी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एडवर्ड हीथ यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यांची ही बंडखोरी यशस्वी ठरली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १९७९, १९८३ व १९८७ अशा तीन वेळा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी हुजूर पक्षाला भरघोस यश मिळवून दिले.
पंतप्रधान असताना थॅचर यांनी खासगीकरणाची प्रक्रिया धडाडीने राबविली. सरकारी मालकीच्या अनेक उद्योगांचे त्यांनी खासगीकरण केले.
 कामगार संघटनांचे वर्चस्व त्यांनी मोडीत काढले. या संदर्भात झालेल्या टीकेला त्या पुरून उरल्या.  फॉकलंड बेटांच्या मुद्दय़ावर १९८२ मध्ये अर्जेटिनाशी झालेल्या युद्धाच्या वेळी त्यांच्या नेतृत्वगुणांची चमक साऱ्या जगाला दिसली.
लोकांचे जेवढे प्रेम तेवढीच टीकाही
एका वाण्याची मुलगी ते विसाव्या शतकातील पोलादी महिला असा प्रवास करणाऱ्या मार्गारेट थॅचर यांना लोकांचे जेवढे प्रेम मिळाले तेवढीच टीका प्रसंगी तिरस्कारही सहन करावा लागला. सरकारी उद्योगांचे खासगीकरण करून कामगार संघटना मोडीत काढण्याची त्यांचे धोरण हे सर्वाधिक वादग्रस्त ठरले. ब्रिटनला आधुनिक चेहरा देणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचे गुणगान करणारे चाहते जसे होते तसेच त्या गरीब आणि श्रीमंतांमधील दरी आणखी वाढवित आहेत, उघडपणाने विषमतेला प्रोत्साहन देत आहेत, अशी क़डवट टीका करणाऱ्या त्यांच्या विरोधकांची संख्याही कमी नव्हती. त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द ही संघर्षमय ठरली. कामगार संघटनांचे आंदोलन चिरडण्यासाठी त्यांनी बळाचा उघडपणे वापर केला. डोक्याला पांढरा रुमाल बांधून रणगाडय़ावर स्वार झाल्याची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या तो बदलत नसत.
पक्षांतर्गत दबावाला त्या फारशी किंमत देत नसत. जनमत विरोधात जात असल्याचीही त्या फारशी फिकीर करीत नसत.
साम्यवादाला कडाडून विरोध हे थॅचर यांचे आणखी एक वैशिष्टय़. या कामी त्यांना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांची साथ निळाली.
या काळातच म्हणजे १९८९ मध्ये बर्लिनची भिंत कोसळलेली जगाने पाहिली. एकत्रित जर्मनी हा युरोपवर वर्चस्व गाजवेल का, अशी चिंता थॅचर यांना वाटत होती. उजव्या आर्थिक धोरणांचा त्यांनी जोरदार पुरस्कार आणि अवलंब केला.
त्यांच्या या धोरणाने ब्रिटनच्या खाण उद्योगाचा पाया हादरला. लाखो कामगार बेरोजगारही झाले. तरीही त्यांचा खासगीकरणाचा धडाका चालूच राहिला. खासगीकणाबाबत त्यांची ठाम मते होती.
या मतांना त्या चिकटून राहिल्या. अगदी सत्ता गमाविण्याची वेळ आली तरीही त्यांनी तडजोड केली नाही.  
प्रतिभावान राजकारणी
मार्गारेट थॅचर यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९२५ रोजी इंग्लंडमधील ग्रँथम या ठिकाणी झाला. ब्रिटनच्या पहिल्या व आजवरच्या एकमेव महिला पंतप्रधान आणि त्याचबरोबर सर्वात जास्त कालावधीसाठी पंतप्रधानपदावर राहणारी व्यक्ती असा तिहेरी मान थॅचर यांनी पटकावला होता. रशियातील पत्रकारांनी थॅचर यांच्या निर्णयक्षमतेतील धडाडीमुळे त्यांना ‘पोलादी स्त्री’ अशी उपाधी दिली होती.
थॅचर यांचे वडील अल्फ्रेड रॉबर्ट्स हे एक स्थानिक व्यापारी होते आणि ‘खाली दुकान, वर मकान’ अशा पद्धतीने थॅचर कुटुंबीय राहात होते.
थॅचर यांचे शिक्षण स्थानिक शाळेत म्हणजेच हंटिंग टॉवर रोड प्राथमिक शाळेत झाले. आपल्या शालेय जीवनात त्या अत्यंत कष्टाळू आणि बुद्धिवान म्हणून ओळखल्या जात.
 पियानोवादन, हॉकी, कवितावाचन, जलतरण आणि वक्तृत्व अशा विविध शिक्षणेतर बाबींमध्येही त्यांनी नैपुण्य कमावले होते.
 शालेय जीवनातच वडिलांकडून त्यांना ‘हुजूर पक्षाच्या’ राजकारणाचे धडे मिळाले. अत्यंत प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये थॅचर यांची गणना होत होती. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सॉमरव्हिले कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली होती.
आपल्या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी सहसंशोधक म्हणूनही काम केले होते.
थॅचर उवाच..
मला वादविवाद करायला आवडतात. माझ्या कोणत्याही विधानाशी समोर बसलेल्या लोकप्रतिनीधींनी सहमत व्हावे हे मला मंजूरच नाही. उलट माझे मुद्दे खोडून काढणे हे त्यांचे खरे कर्तव्य आहे. – (१९८०)
जोपर्यंत माझ्या मंत्रीमंडळातील मंत्री मी सांगितलेले ऐकतात तोपर्यंत माझे मंत्री किती बोलतात याची मला फिकीर नाही. (१९८०)
या जगात ‘सोसायटी’ अर्थात समाज नावाची गोष्टच नसते. येथे व्यक्ती असतात, पुरुष असताता, स्त्रीया असतात आणि कुटुंबे असतात.     (१९८७)
घर चालवायचं म्हणजे कोणत्या अडचणींचा सामना करायचा हे ज्या गृहिणाला कळू शकतं तिलाच देशासमोरील समस्या कशा सोडवाव्यात हे समजू शकतं.
(पंतप्रधान होण्यापूर्वी, १९७९)
जीवनक्रम
१३ ऑक्टोबर १९२५ – मार्गारेट हिल्टा रॉबर्ट यांचा ग्रन्थम, लॅन्केशायर येथे जन्म़
१९४० – ऑक्सफोर्ड विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले आणि हुजुर पक्षाच्या याच विद्यापीठातील संघटनेच्या त्या अध्यक्षा बनल्या़  हे त्यांच्या राजकीय जीवनाचे पहिले पाऊल होत़े
१९५१ – डेनिस थॅचर यांच्याशी विवाहबद्ध़
१९५९ – फिंचले येथून हुजुर पक्षाच्या खासदार म्हणून निवड़
१९७० – सार्वत्रिक निवडणुकीत हुजुर पक्षाचा विजय झाल्यानंतर एडवर्ड हेथ यांनी, त्यांची शिक्षण आणि विज्ञान विभागाच्या सचिव पदी नियुक्ती केली़  मात्र १९७४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना हे पद सोडावे लागल़े
फेब्रुवारी १९७५ – एडवर्ड हेथ यांच्याविरुद्ध नेतृत्वाचे आव्हान समर्थपणे पेलल़े
४ मे १९७९ – थॅचर यांनी ब्रिटनच्या प्रथम महिला पंतप्रधानपदी निवड़  त्यानंतर साडेअकरा वष्रे त्या पंतप्रधानपदी राहिल्या़  विसाव्या शतकात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणाऱ्या व्यक्ती ठरल्या़
२ एप्रिल १९८२ – अर्जेटिनाचा फॉकलॅन्ड बेटांवर हल्ला़  काही दिवसांतच थॅचर यांनी दक्षिण अ‍ॅटलांटिकमध्ये मोठे लष्करी कृती दल पाठविल़े
१४ जून १९८२ – ब्रिटीश सैन्याने स्टेन्ले बंदर पुन्हा हस्तगत केल़े  अर्जेटिनाची शरणागती़  या धडक कामगिरीमुळे थॅचर यांना ‘पोलादी महिला’ हे बिरुद मिळाल़े
९ जून १९८३ – फॉकलॅन्ड युद्धाच्या पाश्र्वभूमीवर थॅचर यांनी सलग दुसरी सार्वत्रिक निवडणूक १४४ च्या बहुमताने जिंकली़  
१२ ऑक्टोबर १९८४ – ब्रायटन येथील ग्रँड हॉटेलमध्ये भरलेल्या हूजूर पक्षाच्या अधिवेशनात थॅचर यांच्यावर जीवघेणा बाँबहल्ला. हा हल्ला आयरीश रिपब्लिकन आर्मीने केला होता. मात्र सुदैवाने थॅचर यांना किंचितही इजा झाली नाही.
११ जून १९८७ – १०१ जागांसह थॅचर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली.
नोव्हेंबर १९९० –  पंतप्रधानपदाचा राजीनामा.
२२ मार्च २००२ – तब्येतीच्या कारणास्तव थॅचर यांना जाहीर भाषणे करण्यास डॉक्टरांची मनाई.
३० जानेवारी २००८ – डेव्हिड कॅमेरून यांनी थॅचर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
१ नोव्हेंबर २०१० – जगातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून थॅचर यांची निवड
८ एप्रिल २०१३ – ८७ व्या वर्षी थॅचर यांचे निधन
राजकारणातील झेप  
१९५९ मध्ये त्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेल्या. निवृत्तीवेतन आणि राष्ट्रीय विमा या विषयांवरील कनिष्ठ संसदीय सचिवपदी त्यांची १९६१ मध्ये निवड झाली. याच सुमारास मजूर पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त झाले होते, यावेळी थॅचर यांची ‘श्ॉडो कॅबिनेट’ मंत्रिमंडळात वर्णी लागली. १९७० मध्ये हुजूर पक्ष पुन्हा सत्तेत आला, यावेळी थॅचर यांना शिक्षण आणि विज्ञान खाती मंत्री म्हणून देण्यात आली. आपल्या या कार्यकालात त्यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुग्धवाटप करण्याची योजना बंद केल्याने त्या टीकेच्या धनी ठरल्या. मंत्रिमंडळातील महिला म्हणून आपल्या अनुभवातून त्यांनी १९७३ साली एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘या देशात महिलांना जन्मात कधी पंतप्रधान होता येईल असे मला तरी वाटत नाही’, असे विधान केले. १९७४ साली सत्तांतर झाले आणि मजूर पक्ष सत्तेत आला. मात्र यानंतर हुजूर पक्षातील थॅचर यांचे वजन वाढले. १९७५ साली त्यांची हुजूर पक्षाच्या प्रमुख म्हणून निवड झाली. आणि याबरोबरच मार्गारेट थॅचर या हाऊस ऑफ कॉमन्समधील ब्रिटनच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या.
राजकारणातील प्रारंभीची अयशस्वी उडी  
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत थॅचर यांनी हुजूर पक्षातर्फे डार्टफोर्ड संसदीय मतदारसंघासाठी निवडणूक लढवली. उदारमतवादी मजूर पक्षाचे विजेतेपद निश्चित आहे हे माहीत असतानादेखील त्यांनी हे धाडस दाखवले. यात त्यांचा सलग दोन वेळा पराभव झाला. मात्र आपल्या घणाघाती आणि अभ्यासू भाषणांनी त्यांनी विरोधकांच्या मनातही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. १९५१ मध्ये त्यांचा डेनिस यांच्याशी विवाह झाला. १९५२ मध्ये त्यांनी कॅरोल आणि मार्क अशी जुळी मुलेही झाली. याच दरम्यान त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
पंतप्रधानपदाची पाश्र्वभूमी  
या सुमारास इंग्लंड दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर होता. वाढती बेरोजगारी, कामगार संघटनांची आंदोलने आणि आर्थिक तसेच राजकीय अनागोंदी यांनी बजबजपुरी झाली होती. या पाश्र्वभूमीवर १९७९ साली इतिहास घडला. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून थॅचर यांनी सत्तासूत्रे हाती घेतली. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत कामगार संघटनांचे कंबरडे मोडणारे आणि कॉर्पोरेट जगताला चालना देणारे धोरण आखणाऱ्या म्हणून थॅचर यांच्याकडे पाहिले जाते.
पंतप्रधान   
मार्गारेट थॅचर यांना देशाने सलग तीनवेळा पूर्ण बहुमताने निवडून दिले. १९७९ ते १९९० या कालावधीत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाच्या आपल्या पहिल्या कार्यकालात देशासमोरील मंदीच्या आव्हानावर त्यांनी व्याजदर वाढवून मात केली. सामाजिक गृहनिर्माण योजना आणि सार्वजनिक परिवहन यांचे त्यांनी खासगीकरण घडवून आणले. एप्रिल १९८२ मध्ये अर्जेटिनाने फॉकलँड बेटांवर चढाई केली. अवघ्या दोन महिन्यांत थॅचर यांनी आपल्या सैन्याच्या मदतीने अर्जेटिनाचा बीमोड केला.
या ‘पोलादी महिले’चा पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकालही आव्हानात्मकच होता. या कार्यकालात त्यांना अनेक आक्रमणांना तोंड द्यावे लागले. ऑक्टोबर १९८४ मध्ये ब्रायटन येथे भरलेल्या हुजूर पक्षाच्या परिषदेत त्यांच्यावर आयरिश रिपब्लिकन आर्मीतर्फे बाँबहल्ला केला गेला.
 मात्र यानंतरही जराही न डगमगता थॅचर यांनी परिषद सुरूच ठेवली शिवाय दुसऱ्या दिवशी परिषदेसमोर मार्गदर्शनपर भाषणही केले. आपल्या परराष्ट्र धोरणाबाबतही त्या कमालीच्या ठाम होत्या. त्यांनी या कालखंडात रशियाचे प्रमुख गोर्बाचेव्ह यांची भेट घेतली. हाँगकाँगबाबत चीनशी करार केला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या लिबियावरील हल्ल्याला जाहीर समर्थन दिले.
१९८७ च्या निवडणुकीतही थॅचर यांना देशाने पुन्हा एकदा निवडून सत्तेवर आणले. या कालखंडात त्यांनी आकारलेल्या स्थिर स्थानिक कराचे वर्णन अनेकांनी ‘पोल टॅक्स’ अर्थात निवडणूक कर असे केले. त्यांच्या या धोरणास तसेच युरोपीय महासंघाबाबत त्यांच्या भूमिकांना मंत्रिमंडळातूनच विरोध झाला. देशभरातील जनमत या काळात प्रक्षुब्ध झाले होते. अखेर थॅचर यांनी १९९० मध्ये पक्षप्रमुखपद आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
शांततापर्वातील सर्वोत्तम पंतप्रधान- कॅमेरॉन
  लंडन : ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान थॅचर यांना मिळाला होता, पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक आव्हाने यशस्वीपणे पार केली, ब्रिटनच्या शांततापर्वातील सर्वोत्तम पंतप्रधान अशीच इतिहासात त्यांची नोंद होईल, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी थॅचर यांच्या निधनानंतर व्यक्त केली.
थॅचर यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्पेनचा दौरा मध्येच सोडून अंत्यसंस्कारांसाठी ते मायदेशी परतले. थॅचर यांनी आमच्या देशाचे केवळ नेतृत्वच केले नाही, तर रक्षणही केले, असे ते म्हणाले.
केवळ आपल्या देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे राजकीय चित्र बदलण्याची क्षमता फार कमी नेत्यांमध्ये असते, थॅचर यांच्यात अशी क्षमता होती. जगभरातील राजकारणावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी व्यक्त केली.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…